पालिका बरखास्तीच्या मागणीसाठी इचलकरंजीत एकवटल्या संघटना

ऋषीकेश राऊत
Thursday, 29 October 2020

नरेश भोरे यांच्या आत्मदहनाच्या तिसऱ्या दिवशीही शहरात तीव्र पडसाद उमटले. विविध संघटनांच्या वतीने प्रांताधिकारी, अपर पोलिस अधिक्षकांना निवेदने देऊन आत्मदहनाची चौकशी करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

इचलकरंजी : नरेश भोरे यांच्या आत्मदहनाच्या तिसऱ्या दिवशीही शहरात तीव्र पडसाद उमटले. विविध संघटनांच्या वतीने प्रांताधिकारी, अपर पोलिस अधिक्षकांना निवेदने देऊन आत्मदहनाची चौकशी करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. इचलकरंजी नगरपालिका बरखास्त करा या घोषणा देत पालिकेतील पांढऱ्या कपड्यांच्या मक्तेदारांचा धिक्कार केला. 

समता संघर्ष समितीची निदर्शने 
समता संघर्ष समितीने नगरपालिकेसमोर निदर्शने केली. पालिकेच्या बेजबाबदारपणाचा तीव्र शब्दात समाचार घेत पालिका कारभाराचा निषेध केला. नगरपालिका बरखास्त करा, सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो या घोषणांनी आंदोलनातील वातावरण तापले. पालिका प्रवेशद्वारावर मोठा पोलिस बंदोबस्त होता. नगरपालिका कारभाराविरोधी संतप्त झालेल्या जमावाने पालिका प्रशासनाला धारेवर धरले. नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी चलेजाव असा नारा देत भोरे यांच्या आत्मदहनाला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक घटकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नरेश भोरे अमर रहे च्या घोषणा देत भोरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना दिले. 
प्रसाद कुलकर्णी, सदा मलाबादे, शशांक बावचकर, अभिजित पटवा, दत्ता माने, विनायक चव्हाण, सौ. उषा कांबळे, सुनील बारवाडे, भाऊसाहेब कसबे, अजित मिणेकर, बाबासो कोतवाल, मनोज कमलाकर आदी उपस्थित होते. 

कामगार कृती समितीचे निवेदन 
भोरे यांच्या आत्मदहनाची चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. खरात व अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना दिले. भोरे यांच्या आत्मदहनास पूणपणे जबाबदार असणाऱ्या नगरपालिका प्रशासनावर योग्य ती कारवाई करून संबंधितांना खुनाच्या आरोपाखाली अटक करावी अशी मागणी केली. मिश्रीलाल जाजू, दत्ता माने, आनंदा गुरव, शामराव कुलकर्णी, संजय खानविलकर, रियाज जमादार, बंडोपंत सातपुते, रवींद्र कांबळे आदी उपस्थित होते. 

जनआधार ट्रस्टची चौकशीची मागणी 
आत्मदहनाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जनआधार सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्याकडे केली. याबाबत सखोल कायदेशीर चौकशी होऊन नगरपालिकेतील होणारा भ्रष्टाचार थांबवावा व दोषींवर कडक कारवाई करावी अशी विनंती केली. डॉ. नितीन भाट, डॉ. किरण इंद्रेकर आदी उपस्थित होते. 

टेम्पो चालक मालकांचे प्रांतांना निवेदन 
टेम्पो चालक, मालक असोसिएशनने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना निवेदन दिले. घटनेची सखोल चौकशी करावी. नगरपालिकेतील संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. सचिन जाधव, सुरेश साळुंखे, यासीन बाणदार, मलिक देवरमनी, राजू माने, गोपाल सांगावे, प्रभू काकणकी आदी उपस्थित होते. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand For Dismissal Of Ichalkaranji Corporation Kolhapur Marathi News