विदेशी भाजीपाल्याची मागणी वाढतेय

 Demand for exotic vegetables is increasing
Demand for exotic vegetables is increasing

कोल्हापूर,  : लोकांच्या खाणपाणात होत असलेला बदल, आरोग्याबाबतची वाढत असलेली जागरुकता यामुळे भाजीपाला व सॅलडची मागणी वाढली आहे. जास्तीत जास्त पोषणमूल्य असणाऱ्या भाज्या व वर्षभर पुरवठ्यातील सातत्य यात विदेशी भाजीपाला सरस ठरत आहे. शेतकऱ्यांनाही या पिकांचा मोबदला चांगला मिळत असल्याने अभ्यासू, होतकरू, शेतकरी या भाजीपाला उत्पादनाकडे वळले आहेत. शेतीला किफायतशीर बनवणारी ही पिके जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपयुक्‍त ठरणार आहेत. 

अलीकडच्या काळात लोक आरोग्याबाबत जागृत होऊ लागले आहेत. यात कोरोनामुळे अधिकच भर पडली आहे. चांगली प्रतिकारशक्‍ती असल्याने अनेक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. त्यामुळे प्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी आठ महिने लोकांनी कसोशीने प्रयत्न केले. विशेषत: जेवणातच प्रतिकारशक्‍ती वाढवणाऱ्या घटकांचा समावेश केला. यामध्ये विदेशी भाजीपाल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले. प्रामुख्याने ब्रोकोली, बेसील, रेड कॅबेज, रेड रॅडीश, रेड व यलो कॅपसिकम, यलो व ग्रीन झुकीनी, बेबीकॉर्न, अशा भाज्यांची मागणी वाढू लागली आहे. विदेशी भाजीपाल्यातील पोषण मूलद्रव्यांचा विचार करून त्यांचा सॅलडमध्ये वापर केला जात आहे. 

जिल्ह्यात ठिकठिकाणी या विदेशी भाजीपाल्याची शेती केली जात आहे. ग्रीन हाउसमुळे 12 महिने हे उत्पादन घेता येत असल्याने तरुण शेतकऱ्यांचा त्याकडे ओढा वाढला आहे. सध्या 12 ते 15 विदेशी भाज्यांना खूप मागणी आहे.90 ते 100 दिवसांत या भाज्यांचे उत्पादन घेण्यास सुरुवात होते. मोठमोठ्या हॉटेलसह मॉलमध्ये या भाजीपाल्याची विक्री केली जाते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वर्षभर या भाज्यांना मिळणारा दर एक सारखा आहे. वर्षभर सरासरी 80 ते 100 रुपये किलोने या भाज्यांची विक्री होत आहे. दराची हमी मिळत असल्यानेच या भाजीपाल्याची शेती जिल्ह्यात वाढत आहे. 


विदेशी भाजीपाल्यात खूप पोषणमूल्य आहे. न्युट्रिशियन्स, प्रोटीन्स, मिनरल, व्हिटॅमिन आणि लो फॅट यामुळेच या भाजीपाल्याची मागणी वाढत आहे. आता केवळ हॉटेल, मॉलपुरती ही बाजारपेठ मर्यादित राहिली नसून इतर भाज्यांप्रमाणेच या भाज्या आता बाजारात दिसू लागल्या आहेत. तसेच इंटरनेटमुळे ही शेती करणे व उत्पादनाची घरबसल्या विक्री करणेही सोपे झाले आहे. त्यामुळे तरुण व आवड असणाऱ्यांनी या क्षेत्रात प्रवेश करावा. 
- प्रसाद बुरुड, विदेशी भाजीपाला उत्पादक. 

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com