यंत्रमाग कारखान्यात डेंगीच्या अळ्या

संजय खूळ
सोमवार, 1 जून 2020

गेले दोन ते अडीच महिने बंद असलेल्या यंत्रमाग उद्योगासह शहरातील विविध उद्योगावरील पाण्याच्या टाक्‍या डेंगीच्या साथीला कारणीभूत ठरत आहेत. शहरामध्ये 10 पैकी एका पाण्याच्या टाकीमध्ये डेंगीची अळी आढळून येत आहे. यामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. 

इचलकरंजी : गेले दोन ते अडीच महिने बंद असलेल्या यंत्रमाग उद्योगासह शहरातील विविध उद्योगावरील पाण्याच्या टाक्‍या डेंगीच्या साथीला कारणीभूत ठरत आहेत. शहरामध्ये 10 पैकी एका पाण्याच्या टाकीमध्ये डेंगीची अळी आढळून येत आहे. यामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. 

दरम्यान, नागरिकांनी साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये तसेच फ्रीजच्या मागेही अनेक ठिकाणी डेंगीची अळी सापडत आहे. धक्कादायक बाब म्हणजे 5 टक्के घरामध्ये फ्रीजच्या मागे डेंगीच्या अळ्या आढळल्या आहेत. 

शहरात यंत्रमाग उद्योगामध्ये फवारणी यंत्र अत्यावश्‍यक बाब आहे. यंत्रमाग कारखान्यातील उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी पाण्याचा फवारा वापरण्यात येतो. यासाठी सर्वच यंत्रमाग कारखान्यावर पाण्याच्या टाक्‍या ठेवण्यात येतात. दोन अडीच महिन्यात या पाण्याच्या टाकीकडे उद्योजकांनी दुर्लक्षच केले आहे. बहुतांश अनेक पाण्याच्या टाक्‍या या उघड्यावरच होत्या. त्यामुळे या पाण्यामध्ये डेंगीचे डास मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यंत्रमाग सुरू करण्यासाठी कारखान्याची साफसफाई तसेच टाक्‍यांचा वापर पुन्हा सुरू झाल्यानंतर या डेंगीच्या अळ्या अनेक भागात पसरल्या आहेत. 10 पैकी 1 टाकीमध्ये डेंगीच्या अळ्या सापडत असल्याने ही बाब गंभीर बनत चालली आहे. 

शहरातील नागरी वस्तीतही ठिकठिकाणी पाण्याचे बॅरेल घराबाहेर ठेवले आहेत. वास्तविक शहरात नियमित पाणीपुरवठा होत असताना नागरिकांनी या पाण्याच्या टाक्‍या वेळेवर रिकाम्या करून ते वाळवणे आवश्‍यक होते. मात्र तसे न झाल्याने अनेक घरामध्ये डेंगीने शिरकाव केला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंत्रणेत काम करणारे सफाई कामगार आता हळूहळू पालिकेच्या अन्य उपाययोजनाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे डेंगीला परतविण्यासाठी पालिका आता पुन्हा सतर्क झाली आहे. 

बांधकामाच्या ठिकाणीही डेंगी 
शहरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही कामे ठप्प होती. या काळात अनेक बांधकामाच्या ठिकाणी पाणी साचून राहिले. अशा ठिकाणीही मोठ्या प्रमाणात डेंगीला कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. 

दक्षता घेणे आवश्‍यक
नागरिकांनी याबाबत दक्षता घेणे आवश्‍यक आहे. स्वच्छ साठवणूक ठेवलेल्या पाण्यात डेंगीचे डास मोठ्या प्रमाणात वाढतात. या टाक्‍या वेळेवर रिकाम्या करून त्या कोरड्या केल्यास डेंगीचे डास नष्ट होतात. नागरिकांनी दक्षता घेतल्यास याला आळा बसेल. 
- डॉ. सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी 

पाण्याचा फारसा वापर झालाच नाही
गेले दोन ते अडीच महिने यंत्रमाग कारखाने बंद होते. त्यातच कारखान्याच्या टाकीवरील टाकीमध्ये पाण्याचा साठा होता. या पाण्याचा फारसा वापर झालाच नाही. यामुळे आम्ही पालिकेच्यावतीने टाक्‍यांची तपासणी करून घेऊन या पाण्याचा वापर सुरू केला आहे. 
- प्रकाश पाटील, यंत्रमागधारक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue larvae In A Spinning Mill Kolhapur Marathi News