
संशयिताचा कोणताही सबळ माहिती नसतांना अत्यंत कौशल्यांने तपास करुन या प्रकरणाचा छडा लावला.
इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील लायकर मळ्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या खूनाचा पोलीसांनी छडा लावला आहे. उधारीवर दारु पिण्यास न दिल्याच्या कारणातून उत्तम राजाराम चौगुले (वय 45, मुळ राहणार तिळवणी, ता.हातकणंगले) याचा जनावराच्या गोठ्यात गळ्यावर कटरने खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नजीर रशिद मुल्लाणी (वय 35, रा. लिंबू चौक, मुळ राहणार हेरलगे मळा) याला अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलीस उप अधिक्षक बी.बी. महामुनी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक श्रीकांत पिंगळे, उप निरिक्षक भागवत मुळीक, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास जाधव उपस्थीत होते.
लायकर मळ्यातील संजय लायकर यांच्या जनावराच्या गोठ्यात चौगुले हा 29 ऑक्टोबर रोजी झोपला होता. त्याच्या गळ्यावर वार करण्यात आल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा सांगली सिव्हील रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला होता. याबाबत शिवाजीनगर पोलिसांत अज्ञात व्यक्तीवर गुन्हाचा नोंद करण्यात आली होती. गेली दोन महिने या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत होते. पोलीस उप अधिक्षक महामुनी यांनी या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेतला होता. त्यांनी या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह शिवाजीनगर पोलिसांचे एक स्वतंत्र पथक तयार केले होते. त्यानुसार तपास सुरु असतांना संशयीत मुल्लाणी यांने हा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केली. त्यामध्ये त्यांने उधारीवर दारु पिण्यास न दिल्यामुळे चिडून कटरने चौगुले याच्या गळ्यावर वार केल्याचे कबुल केले आहे.
सशंयीत मुल्लाणी हा यंत्रमाग कामगार आहे. तो नेहमी चौगुले याच्याकडे दारु पिण्यासाठी जात होता. यापूर्वी अनेक वेळा त्याला चौगुले यांने उधारीवर दारु पाजली होती. घटनेच्या दिवशीही मुल्लाणी हा चौगुले याच्याकडे गेला होता. त्यावेळी चौगुले हा लायकरांच्या गोठ्यात झोपला होता. यावेळी मुल्लाणी यांने त्याला शिविगाळ करुन त्याच्या गळ्यावर कटरने वार करुन तेथून पसार झाला.या प्रकरणाचा संयुक्त तपास पोलीस उप अधिक्षक महामुनी यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलिसांच्या पथकांने केला.
हेही वाचा- Good News:कोल्हापूकरांनो कोव्हॅक्सिीन लस दाखल -
संशयिताची कोणतीही सबळ माहिती नसतांना अत्यंत कौशल्यांने तपास करुन या प्रकरणाचा छडा लावला. सुरुवातीला आर्थिक अथवा अनैतिक संबंधातून हा खून झाला असावा, अशी शक्यता गृहीत धरुन पोलिसांनी सखोल तपास केला होता. त्यासाठी मृताच्या बँक खात्यांचीही चौकशी केली होती. मात्र त्यातून कांहीच निष्पन्न न झाल्यामुळे तपास पथकही चक्रावले होते. मात्र मुल्लाणी यांनेच चौगुले याचा खून केल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक केली. यापूर्वीही संशयिताकडे केली होती. खून प्रकरणाची चौकशी करतांना कांही संशयितांची पोलिसांनी चौकशी केली होती. मुल्लाणी यालाही शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेवून दोन दिवस चौकशी केली होती. मात्र त्यातून कांहीच निष्पन्न न झाल्यामुळे त्याला सोडून दिले होेते. मात्र अखेर आज त्याच्या हातात बेड्या पडल्याच.
संपादन- अर्चना बनगे