संपूर्ण लॉकडाउन करूनही इचलकरंजीत वाढताहेत रूग्ण 

Despite the lockdown, patients are increasing in Ichalkaranji
Despite the lockdown, patients are increasing in Ichalkaranji

इचलकरंजी :  कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी शहरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. पण लॉकडाउनच्या कालावधीतही शहरात कोरोनाचा कहर सुरुच राहिला आहे. गेल्या सहा दिवसात तब्बल 55 रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासन पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानंतरही कोरोना रुग्णांचे वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. शहरात दिवसेंदिवस फैलावत चाललेल्या कोरोनावर कसे नियंत्रण मिळवायचे?, हा प्रश्‍न यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे. 

सुरुवातीच्या काळात शहरात कडक लॉक डाऊन पाळण्यात आला. त्यानंतर बरेच दिवस ठप्प राहिलेला यंत्रमाग उद्योग शिथीलतेच्या काळात पूर्व पदावर येत होता. पण कुडचे मळ्यातील यंत्रमाग कारखान्यांतून समुह संसर्गाला सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील विविध भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले. आज शहरात 34 कंटेन्टमेंट झोन तयार झाले आहेत. या क्षेत्रांमध्ये असणारे यंत्रमाग कारखाने बंद ठेवावे लागले आहेत. त्यामुळे पुर्वपदावर येत असलेला यंत्रमाग उद्योग पुन्हा एकदा अस्थीर होण्याच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योजकांमध्ये अवस्थता पसरली आहे. 

दुसरीकडे प्रशासनाकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्‍यक उपाय योजना केल्या आहेत. सर्व्हे करुन लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. तर कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी शहर सनियंत्रण समितीने लॉक डाऊनचा निर्णय घेतला. समितीने 7 ते 14 जुलै या कालावधीत 100 टक्के लॉकडाउन जाहीर केले आहे. सुरुवातीला रुग्णांची संख्या रोडावत असल्याचे चित्र दिसत असतांनाच पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे वस्त्रनगरी हादरली आहे.

लॉकडाउनच्या पहिल्या सहा दिवसांत तब्बल 55 बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे लॉकडाउनचा निर्णय योग्य हा अयोग्य हा वादाचा विषय होवू शकतो. पण शहरात रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. त्यामुळे वाढत्या संसर्गावर कसे नियंत्रण आणायचे ?, हा प्रश्‍न सध्या तरी अनुत्तरीतच आहे. 

लॉकडाऊन काळातील रुग्णांची संख्या 
7 जुलै - 11 
8 जुलै - 3 
9 जुलै - 9 
10 जुलै - 2 
11 जुलै - 14 
12 जुलै - 16 

विना कारण फिरणे ठरू शकते घातक..... 
घरीच रहा, सुरक्षीत रहा..., असे प्रशासन सातत्यांने सांगत असले तरी आम्ही घरी थांबणार नाही, अशी उटल भूमिका अनेक नागरिक घेतांना दिसत आहेत. शिथिलतेच्या काळात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी झाली होती. असा बेशिस्तपणा कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरण्याची भिती आहे. दिवसभर रस्त्यावरुन नाहक फिरणाऱ्यांची संख्याही कांही कमी नाही. 
 

कन्टेंटमेंट झोनमधील बेशिस्तपणा 
शहरात तब्बल 34 कन्टेंटमेंट झोन तयार झाले आहेत. या झोनमधील नागरिकांना अन्यत्र फिरता येत नाही. पण उलटे चित्र पाहावयास मिळत आहे. नागरिक स्वंयशिस्त पाळतांना दिसत नाहीत. सर्वच झोनमध्ये घोळका करुन गप्पा मारण्यात येत आहेत. पोलिसांचे वाहन झाल्यावर पळून जातात. त्यानंतर पुन्हा गप्पा सुरुच राहतात. कोरोनाला रोखण्यासाठी स्वंयशिस्त पाळणे महत्वाचे आहे. 

दृष्टिक्षेप  
- कुडचे मळ्यात समूह संसर्गाला सुरूवात 
- इचलकरंजीतील विविध भागात आढळू लागले रूग्ण 
- सहा दिवसात आढळले 55 रूग्ण 
- इचलकरंजीत सध्या 34 कंटेन्मेंट झोन 
- कारखाने बंद असल्याने यंत्रमाग उद्योजकांत अस्वस्थता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com