पत्रक बावड्यातून; सही आमदार जाधवांची...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

धनंजय महाडिक खेळाडूविरोधी असल्याचा हवाला ते देतात; पण महाडिकांच्या रक्तातच खेळ आहे, असे सांगून श्री. महाडिक म्हणाले, ‘‘मी स्वतः राष्ट्रीय पातळीवर कुस्ती आणि बॉक्‍सिंग खेळलो आहे. माझे वडील हिंदकेसरी दर्जाचे पैलवान होते.

कोल्हापूर - कृषी प्रदर्शनाला आमदार चंद्रकांत जाधव यांनी विरोध करू नये, एवढीच माझी अपेक्षा होती, त्यावर त्यांनी पत्रक प्रसिद्धीला दिले. यात त्यांचा दोष नाही. कारण  पत्रक बावड्यातून तयार झाले आणि त्यावर फक्त आमदारांनी सही केली, अशी टीका माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगतेप्रसंगी  ते बोलत होते. 

पेठांची वेगळी ओळख सांगायची आहे का? 

उद्‌घाटनावेळी महाडिक यांनी आमदार जाधव यांच्यावर टीका केली होती, त्याला जाधव यांनी प्रत्युत्तर दिले होते, त्यावर आज महाडिक यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘‘मी केलेली टीका सौम्य होती; पण त्यांनी पत्रकात महाडिक गुंड आहेत, आमच्या कार्यक्रमात घुसतो, आमचा कार्यक्रम बंद पाडतो, असे आरोप केले आहेत; पण मी असे बोललोच नव्हतो. आपल्या घरात कोण डोकावले तर त्याला विचारू नको काय? माझ्या प्रदर्शनात तुम्ही कधीही आला नाहीत. काम थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावर मी फक्त त्यांना असे करू नका, असे सांगितले. आमदार सांगतात मी पेठेतील आहे. पेठा शहराच्या अस्मिता आहेत. 

वाचा - आमच्या कार्यक्रमात माणसे घुसवून दाखवाच...

दिलेले पत्रक बावड्यातूनच लिहिले

दिग्गज लोक पेठांतून तयार झाले. मग मी पेठेतील आहे, हे सांगण्याचा तुमचा हेतू काय? आमदारांचा ‘गोकुळ’ आणि इतर राजकारणाशी संबंध नाही, त्यामुळे त्यांनी दिलेले पत्रक बावड्यातूनच लिहिले आहे. चांगल्या कार्यक्रमांना जर विरोध केला तर आज देशभरातून ३०० स्टॉल्स आले आहेत, त्यांचे व बचत गटांचे नुकसान होईल.’’

धनंजय महाडिक खेळाडूविरोधी असल्याचा हवाला ते देतात; पण महाडिकांच्या रक्तातच खेळ आहे, असे सांगून श्री. महाडिक म्हणाले, ‘‘मी स्वतः राष्ट्रीय पातळीवर कुस्ती आणि बॉक्‍सिंग खेळलो आहे. माझे वडील हिंदकेसरी दर्जाचे पैलवान होते. माझी मुलेही खेळाडू आहेत. तुम्ही किती लोकांना मदत करताय माहीत नाही; पण महाडिक कुटुंबीय  खेळाडूंना 
मानधन देतात.’’

बिच्चारे खासदार

 मैदानावरील खेळाडूंचे रक्षण करा, असे मला मंत्री व खासदारांनी सांगितले म्हणून मी येथे आल्याचे आमदार सांगतात. ते खासदार तर बिच्चारे बोलतच नाहीत, त्यांचे नाव कशाला घेतले. ते कायच बोलत नाहीत. ते इथे पण बोलत नाहीत आणि सभागृहातही बोलत नाहीत, असा टोला श्री. महाडिक यांनी खासदार प्रा. मंडलिक यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

बास्केट ब्रिजची खिल्ली

अर्थसंकल्पात कोकण रेल्वेला निधी नाही म्हटल्यावर वाईट वाटले. आम्ही भांडून हा प्रकल्प मंजूर करून घेतला. तिकडे लक्ष नाही. सातारा-कागल सहापदरी रस्ता मंजूर होऊन तीन वर्षे झाली, त्याचाही पाठपुरावा नाही. बास्केट ब्रिज मंजूर आहे, त्याचा निधीही मुंबईत आला आहे; पण त्याचीही खिल्ली उडवली जात असल्याचे श्री. महाडिक म्हणाले.

थेट पाईप आणा

शहरात अनेक प्रश्‍न आहेत. रस्त्यासाठी, खड्ड्यासाठी सह्यांची मोहीम सुरू झाली आहे. तीर्थक्षेत्र आराखडा आहे, त्याकडे लक्ष द्या. खेळाडूंच्या नुकसानीपेक्षा नागरिक विषयुक्त पाणी पितात. थेट पाईपलाईनचा विषय प्रलंबित आहे. तुम्ही आमदार आहात, तुमचे नेते मंत्री झालेत तर या थेट पाईपलाईनचे पाणी आणा आणि मगच पत्रक काढा, असे आवाहन श्री. महाडिक यांनी केले.
मैदानाला किती निधी दिला?
प्रदर्शनामुळे मैदान खराब होते तुम्ही म्हणता, तर तुम्ही मैदानासाठी किती निधी दिला? पाच-दहा रुपये दिले असतील तर सांगा. प्रदर्शनासाठी तीन लाख रुपये डिपॉझीट भरले आहे. खड्डे पडले असले तरी ते भरून देण्याचे काम आम्ही करतो, असे श्री. महाडिक म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Mahadik criticized to chandrkant jadhav kolhapur news