पंढरपूरच्या वारीला नव्हे माहेराला नाही गेलो ः विठ्ठल भक्ताची भक्ताची घालमेल का झाली ?

बुधवार, 1 जुलै 2020

खरतर पंढरपूरचा कानडा विठ्ठल आणि रखुमाई म्हणजेच आमचा बाप आणि आई. पंढरपूरची वारी गेली नऊ वर्षे कधी चुकली नाही. पण, यंदा एखाद्या माहेरवाशिणीला माहेराला जायला नाही मिळालं, तर तिच्या मनाची जी चलबिचल होते, तशीच आमची अवस्था झाली आहे.

कोल्हापूर,ः खरतर पंढरपूरचा कानडा विठ्ठल आणि रखुमाई म्हणजेच आमचा बाप आणि आई. पंढरपूरची वारी गेली नऊ वर्षे कधी चुकली नाही. पण, यंदा एखाद्या माहेरवाशिणीला माहेराला जायला नाही मिळालं, तर तिच्या मनाची जी चलबिचल होते, तशीच आमची अवस्था झाली आहे. कदाचित कोरोनाविरोधातील लढाईला बळ देण्यासाठी आपापल्या कामांत "विठ्ठल' शोधण्याचा "माऊली'चाच विचार असावा आणि म्हणूनच आमची कामं आम्ही विठ्ठलाच्या नामस्मरणातच इमाने-इतबारे करत आहे. 
महापालिकेत झाडू कामगार असणारे बाळासाहेब मोळे संवाद साधत असतात. यंदाची वारी झाली नाही, याबद्दलची त्यांची हुरहुर नक्कीच जाणवत असते. पण, तरीही त्याचवेळी तेही "आरोग्यवारी म्हणजेच पंढरीची वारी' असेही आवर्जून सांगतात. 
यंदा पंढरीची वारीच न झाल्याने लाखो वारकरी आपापल्या गावात विठ्ठलभक्तीत रमले आहेत. अशा साऱ्यांचे श्री. मोळे हे एक प्रातिनिधिक उदाहरण. 
श्री. मोळे मूळचे पन्हाळा तालुक्‍यातील आसुर्ले-पोर्लेनजीकच्या दरेवाडीचे. 2000 सालापासून ते महापालिकेत झाडू कामगार म्हणून काम करतात. ड्यूटी सकाळी सहा ते दुपारी दोन. त्यामुळे मग पहाटे पाउणेपाचलाच ते घरातून बाहेर पडतात आणि सहाला दिवसाची हजेरी देतात. त्यानंतर दोनपर्यंत ते शहराच्या आरोग्यसेवेत तितक्‍याच तळमळीने काम करतात. शहरात ओला व सुका कचरा वेगळा करून तो संकलित केला जातो. त्यातही शहरातील जुन्या पेठांत हा नियम लावताना जरा जास्तीच प्रयत्न करावे लागतात. मात्र, श्री. मोळे यांच्या बोलक्‍या स्वभावामुळे त्यांना ही किमया काही दिवसांतच साध्य झाली आहे. 
ते सांगतात, ""लहानपणापासूनच भजनाची आवड. त्यामुळे मग भजन, कीर्तन, प्रवचन या साऱ्या गोष्टी सुरू झाल्या. "आधी प्रपंच करावा नेटका' या संतांच्या शिकवणीप्रमाणे प्रपंच नेटका केला. एक मुलगा रेल्वेत आणि बाकीचे दोन सेंट्रिंग व्यवसायात आहेत. नऊ वर्षांपासून मग पत्नी शोभाबरोबर पंढरपूरची वारी सुरू केली. वर्षातल्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी दहा दिवस "माऊली'च्या दर्शनासाठी देताना एक वेगळाच आनंद आणि समाधान लाभते. एकदा का माऊलीचे दर्शन झाले की मग वर्षभर पुन्हा आहेतच की साऱ्या गोष्टी.'' 

हीच आमची आनंदवारी... 
आमच्या नवनाथ दिंडीत प्रत्येक वर्षी दीडशेवर लोक असतात. यंदा मात्र कुणाचीच वारी होणार नाही. मात्र, गावातील भैरोबाच्या मंदिरापर्यंत अर्धा किलोमीटरची दिंडी काढून तेथे आम्ही वीणापूजन केले आहे आणि तेथे दररोज भजनासह विविध कार्यक्रम सुरू आहेत. यानिमित्ताने आम्ही काही मोजकीच मंडळी एकवटतो आणि वारीच्या आठवणीत रममाण होतो, असेही श्री. मोळे आवर्जून सांगतात.