गुडघाभर पाण्यातून भाताची कापणी

अजित माद्याळे
Tuesday, 20 October 2020

परतीच्या पावसाने गडहिंग्लज तालुक्‍यातील पिकांचीही दाणादाण उडाली आहे. गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे आज गुडघाभर पाण्यात भात कापणीची कसरत शेतकऱ्यांना करावी लागली.

गडहिंग्लज : परतीच्या पावसाने गडहिंग्लज तालुक्‍यातील पिकांचीही दाणादाण उडाली आहे. गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे आज गुडघाभर पाण्यात भात कापणीची कसरत शेतकऱ्यांना करावी लागली. भुईसपाट झालेले आणि पाण्यातील भात कापणी करताना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

यंदाच्या मॉन्सूनमध्ये पिकांना आवश्‍यक त्यावेळी पाऊस झाल्याने खरीप पिके तरारून आली. सोयाबीन, भात, ऊस, मिरची ही सर्वच पिके चांगली होती. सोयाबीन काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस सुरू झाला. यामध्येही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या महिन्यात मुसळधार झालेल्या परतीच्या पावसाने ऊस आणि भात पीक भुईसपाट झाले.

विशेष करून भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापणीला आलेले भात पडल्याने तोंडचा घास पावसाने पळवल्याचे चित्र तयार झाले. काही ठिकाणी तर शेतवडीत थांबलेल्या पाण्यातूनच भाताची कापणी सुरू केली आहे. या संकटातही शेतकरी स्वत:ला सावरत मिळेल ते पीक हातात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. 

गडहिंग्लज-आजरा रोडवरील आंबेओहोळ ओढ्यानजीकच्या भाताच्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. त्याच अवस्थेत आज दोन शेतकरी भात कापत होते. कापलेले भात ठेवण्यासाठी खुर्चीचा वापर करण्यात आला. एक जण कापणीत व्यस्त होता, तर दुसरा कापलेले भात आणून बांधावर ठेवत होता. 

भाताच्या पिंजरला दुर्गंधी 
भात मळणीनंतर शिल्लक राहणारे पिंजर जनावरांसाठी अतिशय उपयुक्त आहे; परंतु या पावसाने त्याचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. काही ठिकाणी हे पिंजर कुजले असून काही शेतकऱ्यांच्या भाताच्या पिंजरला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे आर्थिक फटका मोठा बसला आहे. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficulties In Harvesting Paddy Kolhapur Marathi News