आजही चर्चा....  जिवंत वाघ, अस्वल आणि नागाची!

Discussions even today .... Live tigers, bears and snakes!
Discussions even today .... Live tigers, bears and snakes!

कोल्हापूर : कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणूक आणि श्री तुकाराम माळी तालीम मंडळाचा प्रथम मानाचा गणपती ही एक परंपराच. या तालमीने पूर्वीपासूनच राजर्षी छत्रपती शाहूंचा विचार आणि सामाजिक प्रबोधनाची कास धरली. एकशे पंचेचाळीस वर्षांचा संपन्न वारसा असणाऱ्या या तालमीतील नव्या पिढीनेही हा वासरा तितक्‍याच सक्षमपणे पुढे सुरू ठेवला आहे. तालमीने गणेशोत्सवातील सजीव देखाव्यात स्टेजवर आणलेल्या जिवंत वाघ, अस्वल आणि नागाची चर्चा मात्र आजही होते. 

 मंगळवार पेठेतील श्री तुकाराम माळी तालमीची स्थापना 1875 ची. (कै) माळी यांनी तालमीला स्वतःची जागा दिली आणि त्या जागेवर तालीम उभारली. (कै) शंकराव बोंद्रे, (कै) यशवंत माने, (कै) दत्तोबा माने, (कै) वसंत पोवार आदींनी तालमीची धुरा सुरवातीच्या काळात सांभाळली. तालमीचा गणेशोत्सव 1960 पासून सुरू झाला आणि येथील सर्व उत्सवांना सार्वजनिक स्वरूप आले. गणेशोत्सवाबरोबर मोहरम हाही येथील प्रमुख सण. यंदाही तालमीत दोन्ही सण एकाचवेळी साजरे होणार आहेत. पान-सुपारीची परंपरा या तालमीने उत्सवकाळात जपली. 1970 मध्ये (कै) पांडूरंग माने अध्यक्ष असताना तालमीची नवीन इमारत बांधली आणि तालमीचा आखाडा सुरू झाला. 1972 पासून गणेशोत्सवात सजीव देखाव्यांची स्पर्धा सुरू झाली आणि पहिल्याच स्पर्धेत तालमीने पहिला क्रमांक पटकावला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची अस्वलाशी झुंज हा देखावा तालमीने साकारताना जिवंत अस्वल स्टेजवर आणले होते. चांगदेव आणि संत ज्ञानेश्‍वर हा देखावा साकारताना तर जिवंत वाघ आणि नागही स्टेजवर आणला. भक्त प्रल्हाद, इंदिरा गांधींचा वीस कलमी कार्यक्रम, दारूबंदी, राजर्षी शाहूंचा हरितक्रांतीचा संदेश, कल्याण खजीना, नेत्रदान, देहदान, हुंडाबळी, अंधश्रद्धा आदी विषयावर तालमीने देखावे सादर केले. देखावे सादर करताना केवळ मनोरंजन यापेक्षाही प्रबोधनात्मक संदेश देण्याचा प्रयत्न पहिल्यापासून तालमीच्या कार्यकर्त्यांनी केला. 
सध्या शिवाजी पोवार तालमीचे अध्यक्ष असून, त्यांच्यासह संदीप चौगले (उपाध्यक्ष), विकास पायमल (सचिव), किरण अतिग्रे (खजानीस), विलास मेथे, किशोर टिपुगडे, एकनाथ टिपुगडे, प्रकाश टिपुगडे, शेखर चौगुले, कृष्णात बोडके, भूषण पाटील, धनाजी पोवार, सचिन चौगुले, प्रविण सूर्यवंशी, नीलेश बोडके, ऋषी जठार, उत्तम माने, अमोल दळवी, अशोक जगताप, अक्षय मेथे आदी मंडळी तालमीच्या माध्यमातून सक्रीय आहेत. 
-- 
दातृत्वाचा हात... 
आपत्कालीन परिस्थितीत तालमीने सतत दातृत्वाचा हात पुढे केला. विविध उत्सवातून काही निधी तालमीतर्फे प्रत्येक वर्षी राखीव ठेवला जातो आणि या निधीतून परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाते. मोफत अभ्यासिका, मोफत व्यायामशाळा, ग्रंथालय योजना, मोफत वाचनालय या सुविधा तालमीतर्फे दिल्या जातात. आरोग्य शिबिरांबरोबरच पदभ्रंमती मोहीम आणि इतर सामाजिक उपक्रमांतही तालीम सतत आघाडीवर राहिली आहे. 
--

तालमीला मोठी परंपरा आहे आणि ती नेटाने पुढे नेण्याची आमची जबाबदारी आम्ही तितक्‍याच सक्षमपणे सांभाळत आहोत. नवी पिढीही तालमीच्या माध्यमातून विधायक कार्यात सक्रीय झाली आहे. तालमीच्या बॅनरखाली राज्य नाट्य स्पर्धेतही तरूणाई रंगमंचीय आविष्कार सादर करते आहे. 
 शिवाजी पोवार, अध्यक्ष 
 

संपादन : सुजित पाटील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com