आजऱ्यामध्ये अधिकारी-विक्रेत्यांत शाब्दिक चकमक; साहित्य केले जप्त

बुधवार, 1 जुलै 2020

आजरा शहरातील मुख्य बाजारपेठ, आजरा-आंबोली मार्ग, पोळगाव रस्त्यासह अन्य ठिकाणी वाढलेले अतिक्रमण नगरपंचायतीला डोकेदुखी ठरत आहे. मुख्य रस्त्यावरील व बाजारपेठेतील अतिक्रमणांमुळे अनेकदा वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात.

आजरा : आजरा नगरपंचायततर्फे आज अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्यांसह गटारीवर छप्पर उभारून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण हटवताना विक्रेते व नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

आजरा शहरातील मुख्य बाजारपेठ, आजरा-आंबोली मार्ग, पोळगाव रस्त्यासह अन्य ठिकाणी वाढलेले अतिक्रमण नगरपंचायतीला डोकेदुखी ठरत आहे. मुख्य रस्त्यावरील व बाजारपेठेतील अतिक्रमणांमुळे अनेकदा वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात. यामुळे वाहनधारकांत वादाचे प्रसंग निर्माण होतात.

त्यामुळे आजरा नगरपंचायततर्फे आज मुख्य बाजारपेठ, संभाजी चौक, तहसील कार्यालय व आजरा-आंबोली रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी मोहीम उघडली. रस्त्यावर भाजीपाला विक्रीसाठी अस्ताव्यस्त बसलेल्या विक्रेत्यांच्या भाजीच्या पाट्या जप्त केल्या. त्याचबरोबर गटारीच्या बाहेर छप्पर काढून विक्रीसाठी ठेवलेले साहित्य, दुकानाचे फलक जप्त केले.

नगरपंचायतीचे 15 कर्मचारी मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. काही दुकानदार व विक्रेत्यांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. यावेळी अधिकारी व दुकानदार यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी झडल्या. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव यांनी हस्तक्षेप केला. मुख्याधिकारी अजिंक्‍य पाटील, कर निर्धारण अधिकारी विजयकुमार मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली. 

दंडात्मक कारवाईचा बडगा 
अतिक्रमण केलेल्या दुकानदारांवर नगरपंचायत दंडात्मक कारवाई करणार आहे. त्याचबरोबर ही मोहीम आठवडाभर शहरात राबविणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

 

kolhapur