जयसिंगपूरमधील डॉक्‍टरांना सुविधा मिळणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोरोना संशयितांवर उपचार करणाऱ्या शहरातील डॉक्‍टरांच्या सुविधांवरून डॉक्‍टर आणि प्रशासनातील वादावर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शुक्रवारी तोडगा काढला. आयएमए हॉलमध्ये तातडीची बैठक बोलावून मंत्र्यांनी डॉक्‍टरांच्या मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिली. याप्रश्‍नी "सकाळ'मध्ये डॉक्‍टरांच्या व्यथा मांडल्यानंतर राज्यमंत्र्यांनी याची दखल घेत हा प्रश्‍न मार्गी लावला.

जयसिंगपूर : कोरोना संशयितांवर उपचार करणाऱ्या शहरातील डॉक्‍टरांच्या सुविधांवरून डॉक्‍टर आणि प्रशासनातील वादावर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शुक्रवारी तोडगा काढला. आयएमए हॉलमध्ये तातडीची बैठक बोलावून मंत्र्यांनी डॉक्‍टरांच्या मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिली. याप्रश्‍नी "सकाळ'मध्ये डॉक्‍टरांच्या व्यथा मांडल्यानंतर राज्यमंत्र्यांनी याची दखल घेत हा प्रश्‍न मार्गी लावला. 

शहरातील शाळा आणि मंगल कार्यालयात शहराबाहेरुन येणाऱ्या लोकांसाठी संस्थात्मक विलगीकरण केंद्रे उभारली आहेत. पालिकेने येथे विविध सुविधाही पुरवल्या आहेत. मात्र, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि जयसिंगपूर मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी तसेच तालुका प्रशासनात डॉक्‍टरांच्या निवासासह पीपीई किटवरून काहीसे मतभेद झाले. सुविधा दिल्या तरच सेवा देण्याच्या भूमिकेवर डॉक्‍टर मंडळी ठाम होती. डॉक्‍टर आणि प्रशासनातील वादामुळे रुग्णांवरील उपचारावर याचे परिणाम होण्याची शक्‍यता होती. 

प्रशासन आणि डॉक्‍टरांमधील हा वाद "सकाळ'ने उपस्थित केल्यानंतर राज्यमंत्री यड्रावकर यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि जयसिंगपूर मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली. यात डॉक्‍टरांनी वस्तुस्थिती मांडली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपचार करणे हे डॉक्‍टरांच्या कुटुंबीयांनाही असुरक्षित आहे. सेवा दिल्यानंतर घरी जाणे कुटुंबीयांना संसर्ग होण्याची शक्‍यता असल्याने सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांच्या निवासाची व्यवस्था करावी तसेच डॉक्‍टरांना पीपीई किट द्यावे, अशी मागणी डॉक्‍टरांची होती. 

मात्र, प्रशासनाकडून याला दाद दिली जात नसल्याने डॉक्‍टरांनी सेवा देण्याकडे पाठ फिरवल्याने रुग्णांवरील उपचार ठप्प होते. प्रशासनाकडून मर्यादा असल्या तरी आपण स्वत: यामध्ये लक्ष घालून डॉक्‍टरांचे प्रश्‍न सोडवू, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिल्यानंतर डॉक्‍टरांचे प्रश्‍न मार्गी लागले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल घोडके, जयसिंगपूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतिक पटेल, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, डॉ. सतीश पाटील, डॉ. बी. एस. पाटील, डॉ. शांता पाटील, डॉ. ए. एस. पाटील, डॉ. अकलंक चौगुले, डॉ. पद्मराज पाटील आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors In Jaysingpur Will Get The Facility Kolhapur Marathi News