कोल्हापुरचे दौलू मास्तर आणि त्यांची शाळा, माहित आहे का तुम्हाला...?

Dolu masters and their schools in Kolhapur
Dolu masters and their schools in Kolhapur

     साधारण तब्बल १३२ वर्षांपूर्वीचा तो काळ आहे. कोल्हापुरात शिक्षणाचे प्रमाण तुलनेत फार कमी. दिवसभर  म्हसराच्या पाठीमागं फिरायचं आणि दिवस मावळला की म्हसर घेऊन घरात परत यायचं, हेच बहुतेक पोरांचं काम होतं. शाळेचे दर्शन बहुतेक मुलांना लांबूनच होत होते. राजर्षी शाहू महारारांजासारखा द्रष्ठा माणूस शिक्षणासाठी एका बाजूला प्रयत्न करत होता. पण सामाजिक परिस्थितीच अशी होती की बहुजन आणि गरीब वर्ग शिक्षणापासून थोडा लांबच राहिला होता. अशा वातावरणात शिवाजी पेठेत दौलू मास्तरांनी एक निश्‍चय केला. पेठेतली पोरं लिहायला वाचायला शिकली पाहिजेत. खूप मोठी झाली पाहिजेत. एवढेच त्यांनी मनावर घेतले. आणि त्यासाठी एक शाळा काढायचे ठरवले. वरुणतीर्थाच्या परिसरात शाळा सुरूही केली. शाळा सुरू झाली. पण शाळेला  पोरंच यायची नाहीत. 
 त्यामुळे शिवाजी पेठेतल्या गल्लीबोळातून शाळेत मुलांना आणण्यासाठी ते फिरू लागले. पोरगं शिकून काय धन लावणार? असं म्हणणाऱ्या पालकांची त्यांनी समजूत काढली आणि पोरांना शाळेत घालायला तयार केले. आईबाप तयार झाले पण दिवसभर मोकळे फिरायची सवय झालेल्या पोरांना शाळा म्हणजे शिक्षा वाटू लागली. त्यामुळे दौलू मास्तर स्वतः घराघरात जाऊन पोरांना हाताला धरुन, पोरगं शाळेला येत नसेल तर त्याची उचलबांगडी करून शाळेला घेऊन येऊ लागले आणि दौलू मास्तरांची शाळा या नावाने सुरू झालेल्या शाळेत ते मुलांना शिकवू लागले.

दौलू मास्तर म्हणजे दौलतराव कृष्णा भोसले. ते पेठेतच राहणारे. दौलतराव तरुणपणातच राष्ट्रीय सामाजिक चळवळीकडे ओढले गेले. त्यांनी स्वतः अत्यंत हलाखीच्या स्थितीत मुलकी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. त्यांचे वडील कृष्णा मास्तरही शिक्षक होते. सामाजिक सुधारणेसाठी शिक्षणाचा प्रसार आवश्‍यक, असे त्यांचे ठाम मत होते. इतर समाज शिकून पुढे जात आहे. पण बहुजन समाज जावळ, बारसे, वरात, ताईबाईची जत्रा, यात गुंतून का पडत आहे, हा त्यांच्या मनाला सतत भेडसावणारा प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतःला झोकून द्यायचे ठरवले. १८७८  ला शिवाजी पेठेत वरुणतीर्थ मैदानाच्या काठावर पहिली शाळा सुरू केली.
सुरुवातीला रडत कुढत शाळेत येणारी मुलं हळूहळू नियमित येऊ लागली. शाळेत बसायला बाकाची सोय नव्हती. त्यामुळे बसायला सोबत होतं बटार (पोते) आणि पाटी दप्तर घेऊन मुले येत होती. शाळेत मुलं नियमित यावीत, म्हणून मास्तरांचा फार कटाक्ष होता. गैरहजर राहिलेल्या मुलांना उचलून आणण्याचे काम तर त्यांनी केलेच, पण शाळेला जायला नको म्हणून माळ्यावर दडून बसणाऱ्या मुलांनाही त्यांनी हुडकून काढून शाळेत आणले. त्यावेळी पहिलीच्या वर्गाला इन्फंट म्हणायचे.
नागपंचमीला पाटी पूजनाच्या निमित्ताने दौलू मास्तरांच्या शाळेतल्या मुलांची मिरवणूक निघायची. हातात आडवी पाटी त्यावर नागाचे चित्र, त्याच्यावर लाह्या, हळदी, कुंकू, तोंडात बे पासून पावकी दिडकी पर्यंतचे पाढे सुरात म्हणत ही मिरवणूक पंचगंगा नदीपर्यंत  जायची.

१९१६ पर्यंत  या शाळेत पहिली ते चौथीचे नियमित वर्ग सुरू झाले. दौलू मास्तरांच्या या कार्याची अनेक प्रस्थापितांनी टिंगल उडवली. बहुजन समाजाच्या चळवळीत हे ते पुढे पुढे राहायचे. रोख-ठोक भाषणाबद्दल त्यांना दोन वेळा मारहाणही झाली होती. दौलू मास्तर यांच्या पत्नी कृष्णाबाई यांनीही आपल्या पतीला या कार्यात साथ  दिली. दौलू मास्तरांच्या या कार्याची दखल शाहू महाराजांनी घेतली व शाळेला वर्षाला चारशे रुपयाची ग्रॅंट सुरू केली. स्पेशल मदतीची शाळा अशी या शाळेची नोंद सरकारी दप्तरात झाली. १९१५ साली दौलू मास्तरांचे  निधन झाले. यानंतर ही शाळा शाहू शिक्षण प्रसारक मंडळाकडे चालवण्यास देण्यात आली. सातवीपर्यंत आठशे मुले या शाळेत होती. १९६२ रोजी शाळा म्युनिसिपल स्कूल बोर्डाकडे हस्तांतरित झाली. आणि तिथे नगरपालिकेने वरूण तिर्थाच्या काठावर शाळेसाठी भव्य इमारत बांधत्नी आणि शाळेवर दौलतराव भोसले विद्यालय अशी पाटी लावली. आज मात्र ही शाळा बंद आहे. इमारतीत महापालिकेचे कार्यालय आहे. इमारतीच्या पाठीमागील बाजूस दौलू मास्तरांचा पुतळा आहे. पण हा पुतळा  पुतळा कोणाचा हे शंभरातले दहा जण ही सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. दौलु मास्तरांचा इतिहास नव्या पिढीने जाणून घेतला नाही तर त्यांचे कार्य काळाच्या ओघात गाडले जाणार हे स्पष्टच आहे.

आत्मविश्‍वासाचे गणित

अ आ इ ई पासून ते तीस पर्यंतचे पाडे पाठ करून घेतले जायचे. दुसरी नंतर पावकी निमकी पासून दीडकी असे पाढे शिकवले जायचे. या पाढ्यांना झडती असे म्हटले जायचे. एक पाव पाव, बे पाव अर्धा,  तीन पाव पाऊन, चार पाव एक असे पाढे मुलं पाठ करायची. घरात जेव्हा मुले पाढे म्हणून दाखवायची. त्यावेळी अडाणी आई बापाच्या चेहऱ्यावर कौतुकाची लव फुलायची. पाढे पाठ असले की मुलात आत्मविश्वास निर्माण होतो हे दौलू मास्तरांच्या गणित शिकवण्यामागचं एक तंत्र होते. आणि त्यांनी तेच तंत्र त्या काळातल्या मुलात भिनवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com