‘जुनं ते सोनंच: जुने दरवाजे, खिडक्‍यांनी घराला वेगळा साज!

संदीप खांडेकर | Wednesday, 25 November 2020

जुन्या वाड्यांचे बांधकाम आजही मनाला भुरळ घालते. नक्षीकाम केलेले मोठे दरवाजे, खिडक्‍या, दगडी दिवळ्या, पलंग, खुर्च्या, आरसा यांचा थाटच काही और असतो.

आर. के. नगर, ता. (कोल्हापूर)  : नव्या घराचं बांधकाम खर्चिक. दरवाजे व खिडक्‍यांवर लाखो रुपये खर्च. त्याला फाटा देऊन सम्राटनगरमध्ये बांधलेलं घर ‘जुनं ते सोनं’ची प्रचीती देणारं ठरलं आहे. जुन्या वाड्याचे बारा दरवाजे, बारा खिडक्‍या, रेलिंग वापरून घराला वेगळा लूक दिला. विशेष म्हणजे घरातील सांडपाणी गटर्सला न सोडता ते जमिनीत मुरविले आहे. 

जुन्या वाड्यांचे बांधकाम आजही मनाला भुरळ घालते. नक्षीकाम केलेले मोठे दरवाजे, खिडक्‍या, दगडी दिवळ्या, पलंग, खुर्च्या, आरसा यांचा थाटच काही और असतो. त्याचबरोबर लाकडी कपाटेही वाड्याची शोभा वाढवतात. बदलत्या जीवनशैलीत घरांचा आकार, डिझाईन बदलत आहे. 

दर्जेदार व गुणवत्तेच्या मटेरियल्स वापरण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यातून घर बांधकामाचा आकडा फुगत आहे; पण सम्राटनगरमधील आर्किटेक्‍ट सचिन पाटील यांनी बांधलेले घर कौतुकाचा विषय ठरले आहे. घराकरिता त्यांनी लक्ष्मीपुरी व उद्यमनगरातील जुन्या वाड्यांचे दरवाजे, खिडक्‍या, बीडाचे रेलिंग खरेदी करून वापरल्या आहेत. नक्षीदार कमानही त्यांच्या नजरेतून सुटलेली नाही. 

Advertising
Advertising

हेही वाचा- स्लो इंटरनेटमुळे वर्क फॉर्म होमला कासवाची गती -

जुने साहित्य त्यांनी मॉडिफाय न करता वापरलेले आहे. या साहित्यासाठी त्यांनी केवळ ऐंशी हजार रूपये मोजले आहेत. नव्या साहित्यासाठी किमान दोन लाखांहून अधिक रूपये खर्च झाला असता, असे ते सांगायला विसरत नाहीत. नव्या घरात त्यांनी दगडी दिवळ्यांचा केलेली मांडणीही वैशिष्ट्यपूर्ण 
ठरली आहे. विशेष असे, की त्यांनी बाथरूम व स्वयंपाकघरातले पाणी गटर्सला न सोडता ते एका टॅंकमध्ये एकत्रित केले आहे. त्यात तीन चेंबर असून, हे पाणी जमिनीत मुरवले आहे. कर्दळ पाणी स्वच्छतेसाठी उपयुक्त असल्याने तिची लागवड केली आहे. पावणे दोन वर्षांत ‘स्वराज्य’ या नावाने घर बांधले गेले आहे. पाटील कुटुंबीयांनी १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनाला गृहप्रवेश केला आहे. 

पाटील म्हणाले, ‘‘आम्ही पती-पत्नी आर्किटेक्‍ट आहोत. जुने मटेरियल वापरून आम्हाला घर बांधायचे होते. नव्या घरासाठी वाड्यांचे दरवाजे, खिडक्‍या, रेलिंग, कमानीचा शोध घेऊन ते खरेदी केले आहे. ते वापरल्याने घराची शोभा वाढली आहे.’’

संपादन- अर्चना बनगे