अधिष्ठाता बदलीचा ताकतुंबा कायम : डॉ. गजभिये आल्या पुन्हा कोल्हापुरात

अधिष्ठाता बदलीचा ताकतुंबा कायम :  डॉ. गजभिये आल्या पुन्हा कोल्हापुरात

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांच्या बदलीला आज पुन्हा एकदा खो बसला आहे. जळगाव येथे बदलीच्या ठिकाणी जात असताना त्यांना पुन्हा आज कोल्हापुरात परत जाण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण संचालकांनी तोंडी दिली. त्यानुसार डॉ. गजभिये नाशिकमधूनच आज कोल्हापूरला परतल्या आणि अधिष्ठाता बदली प्रकरणाचा ताकतुंबा कायम राहिला आहे. 
तीन दिवसांपूर्वी डॉ. गजभिये यांची बदली जळगावला झाली, तर त्यांच्या जागी धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली झाली. त्यानुसार रविवारी रात्री डॉ. गजभिये यांनी आपल्या सहकारी डॉ. आरती घोरपडे यांच्याकडे पदाची सूत्रे तात्पुरती देऊन त्या जळगावला रवाना झाल्या. त्या नाशिकपर्यंत पोचल्या आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालकांनी त्यांना फोनद्वारे कोल्हापूरला जाण्याची सूचना केली. त्यानुसार आज दुपारी त्या कोल्हापुरात आल्या. त्या अधिष्ठाता कक्षात बसून होत्या. 
वास्तविक ज्यांच्या सहीने या बदलीचे आदेश निघाले. त्यांनीच डॉ. गजभिये यांना परत कोल्हापूरला जाण्याची सूचना केली. याबाबत सीपीआर वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 
डॉ. रामानंद यांच्या येथील बदलीविषयी कोल्हापुरातील काही व्यक्तींनी आक्षेप घेत त्यांना कोल्हापूरला आणू नये, असा आग्रह एका वरिष्ठ मंत्र्याकडे धरला. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनीही डॉ. रामानंद यांना कोल्हापुरात नियुक्ती द्यावी, अशी मागणी केली. परस्परविरोधी भूमिकांमधून अधिष्ठातांची बदली मंत्रालयीन पातळीवर प्रतिष्ठेची बनली. 

राज्याचे कोरोना उपचारांचे नोडल ऑफिसर असलेल्या वैद्यकीय संचालक यांच्या सूचनेनुसार निघाले होते. त्याच आदेशानुसार डॉ. गजभिये जळगावला जात असताना मध्येच नाशिकमध्ये थांबून त्यांना परत कोल्हापूरला जाण्याची सूचना संचालकांनी केली. यातून बदलीचे तडकाफडकी आदेश काढले का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 
वास्तविक पूर्णवेळ अधिष्ठाता नियुक्तीसाठी मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या स्वाक्षरीने आदेश निघणे अपेक्षित आहे. हा अधिकार संचालकांना नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, कोरोनाचे वाढते गांभीर्य असल्याचे कारण देत नोडल ऑफिसर या नात्याने हा आदेश निघाला होता. यातच कोल्हापूरला डॉ. रामानंद येणार हे निश्‍चित होताच एका गटाने डॉ. रामानंद यांना विरोध केला, तर एका गटाने त्यांची जोरदार पाठराखण केली. 

वरिष्ठांच्या सूचनेचे पालन ः डॉ. गजभिये 
अन्य काही पर्याय काढून या बदली आदेशात सुधारणा करून नवा निर्णय येत्या दोन दिवसांत येण्याची शक्‍यता आहे. याबाबत अधिष्ठाता डॉ. गजभिये म्हणाल्या, ""वरिष्ठांच्या बदली आदेशाचे पालन म्हणून मी जळगावला निघाले होते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुन्हा कोल्हापुरात आले आहे. वरिष्ठ ज्या सूचना देतील, त्याचे पालन मला करावे लागेल.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com