संचारबंदीच्या काळात डॉ.जयसिंगराव पवार सर वाचन, लेखन व संशोधनात व्यस्त...

Dr Jaysingrao Pawar Sir engaged in reading writing and research
Dr Jaysingrao Pawar Sir engaged in reading writing and research

   'सर, दिनक्रम कसा आहे आपला?,' नेहमीप्रमाणं माझा सरांना प्रश्न. 'पूर्वीचा की आताचा?,' सरांच्या प्रतिप्रश्नावर 'दोन्हीही सांगा,' मी उत्तर देऊन वहितल्या पानावरच्या रेषेवर पेन ठेवला. 'मी सकाळी सव्वा सहाला उठतो. साडे सात ते नऊपर्यंत गच्चीवर वाॅकिंग, योगासने व प्राणायाम करतो. नऊ ते दहा वेळेत अंघोळ व नाश्ता होतो. ग्रंथालयात दहा वाजता ठाण मांडतो,' सरांनी दिनक्रम उलगडायला प्रारंभ केला. दुपारी दोन पर्यंत सर ग्रंथालयात असतात. घरातल्या ग्रंथालयात नानाविध पुस्तके सरांच्या सोबतीला आहेत. लेखन वाचन व संशोधनाच्या कामात सर दोन पर्यंत व्यस्त असतात. तीनपर्यंत जेवण उरकून पुन्हा वर्तमानपत्रे, मासिके चाळतात. त्यांच्या विश्रांतीची वेळ पाच वाजेपर्यंत. साडेपाचला चहा घेतल्यानंतर नऊपर्यंत सर पुन्हा वाचन, लेखन, संशोधनाच्या कामात गुंततात. याच दरम्यान किमान अर्धा तास त्यांचा प्राणायाम चुकत नाही.

साडेनऊला जेवल्यानंतर दहापर्यंत टी.व्ही.वरील बातम्या पाहणं त्यांच नित्याचं आहे. दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत पुन्हा त्यांच वाचन,‌ संशोधन सुरू राहतं. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या व्यासंगाचे परिघ समजून आले. "सर, सध्या कामाचे स्वरूप काय?," हा माझा थेट प्रश्न. "महाराणी ताराबाई यांचा चरित्रविषयक सुमारे ८०० पानांचा ग्रंथ लिहितोय. त्याची प्रस्तावना लिहिण्याचे काम सुरू आहे. सुधीर पेडणेकर यांचे 'चायनाज-इंडिया वाॅर ऑफ १९६२' पुस्तकाचं वाचनही सुरू आहे. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या संचालक पदाची जबाबदारी मी पेलतोय. घरी बसून ती कामही आटपावी लागत आहेत. जस्टीस वैद्य व चंद्रा मुदलियार यांनी पहिले कुलगुरू डॉ. आप्पाबासाहेब पवार त्यांच्या कारकिर्दीत राजर्षी छत्रपती शाहू राजांबद्दल व्याख्याने दिली होती. त्यांचे संपादन केले आहे. त्याच्या छपाईच्या कामाची तयारी सुरु आहे," सरांच्या वेळेच्या सदुपयोगाचे पदर उलगडत होते.

"सर, नवीन काय लिहिताय?," माझे प्रश्न सुरु होते. "छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास हे नवे पुस्तक लिहायला हाती घेतले. कोल्हापूरचा पंचखंडात्मक इतिहासाचा पहिला खंड 'कोल्हापूर ऐतिहासिक व प्राकृतिक'चे काम सुरू आहे. दोन हजार पानांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथाच्या प्रकाशनाची तयारीचे काम करत आहोत," सर भरभरुन सांगत होते. 

"दिवसभरातील कामाकरिता ऊर्जा येते कोठून," न राहून मी सरांना छेडलं. "दररोज माणसे घरी भेटायला येतात. कोरोनामुळे त्यांच येणं बंद आहे. एखादा इतिहासाबाबत नेमकेपणाने माहिती घ्यायला आला तर एक दोन-तास चर्चेत खर्ची पडतात. तो वेळ वाचनासाठी मिळत आहे. नागरिकांनी गायन, वाचन, चित्रकला असे छंद जपायला हवेत. तेच मित्र म्हणून फावल्या वेळात सोबतीला येतात. आवडीचे काम केल्यावर वेळ कसा जातो, हेच कळत नाही. विवेकानंद, तुकाराम गाथेचे वाचन केल्यावर ज्ञानही वाढेल व जीवनही समृद्ध होईल."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com