रूग्णाच्या दहनानंतर इचलकरंजी स्मशानभूमीत औषध फवारणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

इचलकरंजी  येथील पंचगंगा स्मशानभूमीसह परिसर आज औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आला. पालिकेच्या वतीने सकाळी ही मोहिम राबविण्यात आली.

इचलकरंजी :  येथील पंचगंगा स्मशानभूमीसह परिसर आज औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात आला. पालिकेच्या वतीने सकाळी ही मोहिम राबविण्यात आली. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाचे सोमवारी रात्री या स्मशानभूमीत दहन करण्यात आले होते. खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली. 

गावभाग परिसरातील त्रिशुल चौकातील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. मात्र या व्यक्तीला पंचगंगा स्मशानभूमीत दहन केल्यानंतर पॉझीटिव्ह रिपोर्ट आला. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. आज खबरदारी म्हणून स्मशानभूमीसह तेथे नागरिकांना बसण्यासाठी करण्यात आलेले कट्टे, दहनविधीचे साहित्य असलेले गोडावून, रस्ते या ठिकाणी टॅंकरव्दारे औषध फवारणी करुन परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला. 

या शिवाय गावभाग परिसरातील त्रिशुल चौकाचा संपूर्ण भाग, गुरुकन्ननगर परिसरातील सर्व गल्ल्या निर्जंतुकीकरण करण्यात आल्या. यापरिसरातील नागरिकांचा पालिकेकडून सर्व्हे करण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती संकलीत करण्यात येत असून थर्मोमिटरच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी केली जात आहे. शहरात सध्या सातहून अधिक प्रतिबंधित क्षेत्र झाले आहेत. 

दृष्टिक्षेप 
- इचलकरंजी पालिकेतर्फे खबरदारीचा उपाय 
- स्मशानभूमी परिसरात औषध फवारणी 
- त्रिशूल चौक भाग परिसर निर्जंतुकीकरण 
- परिसरात नागरिकांचा सर्व्हे सुरू 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drug spraying at Ichalkaranji Cemetery