गडहिंग्लजला "शिक्षण'च्या कारभाराची झाडाझडती 

Education Deaptment Target In Gadhinglaj Panchyat Samitee Kolhapur Marathi News
Education Deaptment Target In Gadhinglaj Panchyat Samitee Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : गटशिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य महत्वाची पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम शिक्षण विभागाच्या कामकाजावर होत आहे. रिक्त पदे भरण्यासाठी एकत्रित पाठपुरावा करण्याचे आवाहन एकीकडे करतानाच दुसरीकडे सदस्यांनी आज झालेल्या पंचायत समिती सभेत शिक्षण विभागाच्या कारभाराची 'झडती' घेतली.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची माहिती भरताना हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय झाला. सभापती रूपाली कांबळे अध्यक्षस्थानी होत्या. 

सभेच्या सुरवातीलाच जयश्री तेली यांनी शिक्षण विभागाकडील रिक्त पदांमुळे मोठे नुकसान होत असल्याकडे लक्ष वेधले. या प्रश्‍नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिप्पूर तर्फ आजरा येथील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नेसरी केंद्रावर समावेश केला आहे. अधिकाऱ्यांना शिप्पूर तर्फ आजरा व शिप्पूर तर्फ नेसरी या गावातील फरकही कळत नाही का? विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम आणि शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल विठ्ठल पाटील यांनी उपस्थित केला.

उपसभापती श्रीया कोणकेरी यांनी संबंधित विद्यार्थ्यांसाठी वाहनाची व्यवस्था केल्याचे सांगितले. पण, अन्य सदस्यांनीही शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. अखेर गटविकास अधिकारी शरद मगर यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आश्‍वासन दिले. 

गिजवणे ते अत्याळ या रस्त्याकडेला सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडे लावली होती. मात्र, या रस्त्याच्या साईडपट्टीचे काम करताना स्वत:च लावलेली झाडे काढली आहेत. याबाबत प्रकाश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. या रस्त्याचे अर्धवट असलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणीही त्यांनी केली. अतिवृष्टीतील पडझडीच्या नुकसान भरपाईबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रधानमंत्री किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या नावातील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी विठ्ठल पाटील यांनी केली. सात हजार नावात दुरुस्ती झाली असून उर्वरित पाच हजार नावात लवकरच दुरुस्ती केली जाईल, असे श्री. मगर यांनी सांगितले. अंत्योदयच्या धान्याची जादा दराने विक्री सुरु असल्याची बाब इराप्पा हसुरी यांनी निदर्शनास आणून दिली. 

गतवर्षी वृक्षलागवड करताना 60 टक्केपेक्षा अधिक झाडे जगविणाऱ्या ग्रामपंचायतींना 21 हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा प्रकाश पाटील यांनी केली होती. त्यासाठी किती ग्रामपंचायती पात्र ठरल्या आहेत, वर्षभरात ग्रामपंचायतींनी वृक्षलागवडीवर किती रक्कम खर्च केली, त्यातून झाडे किती जगली अशी प्रश्‍नांची सरबत्ती जयश्री तेली यांनी केली. मात्र, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी या प्रश्‍नावर निरुत्तर झाल्याचे दिसून आले.

काळभैरी रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत विठ्ठल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यासह विविध विभागांच्या कामकाजाचा आणि मागील सभेतील सूचनांवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. विद्याधर गुरबे, बनश्री चौगुले, इंदू नाईक आदी उपस्थित होते. दरम्यान, हिडदुगी प्राथमिक शाळा, डॉजबॉलपटू प्रिया देसाई (हसुरवाडी), स्मार्टग्राम इंचनाळ यांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार झाला. 

"त्या' ठेकेदारांना नोटीस 
तालुक्‍यातील पाणी पुरवठा योजनांची कामे रखडलेली आहेत. यातील काही योजनांना ठेकेदारांमुळे विलंब झाला आहे. मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना यापुढे अन्य कामे देऊ नयेत. तसेच त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यासाठी नोटीस लागू करावी, असा ठराव सभेत करण्यात आला. 

न बोलता पाठबळ... 
ग्रामपंचायतीचा कर थकविणाऱ्यांना पंचायत समिती प्रशासनाने लोकअदालतीचा रस्ता दाखविला होता. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून सुमारे 50 लाख रुपयांचा कर जमा झाला आहे. लोकअदालतीनंतरही कर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या साऱ्या प्रक्रियेत पदाधिकाऱ्यांनी न बोलता पाठबळ दिल्याचे सांगत गटविकास अधिकारी शरद मगर यांनी अप्रत्यक्षरीत्या राजकीय हस्तक्षेप न केल्याबद्दल आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com