हत्तीचा धुडगूसच: शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली; गायीवर हल्ल्याचा प्रयत्न
हेरे येथे प्रकार; शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली
चंदगड (कोल्हापूर) : हेरे (ता. चंदगड) येथील संजय पेडणेकर यांच्या भिंगहोळ शेतातील घरासमोर बांधलेल्या गायीवर हत्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून पेडणेकर यांनी ध्वनिवर्धक सुरू केल्याने हत्ती बिथरून माघारी परतले. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला.
पारगड मार्गावर पेडणेकर यांचे शेत आहे. गेले दोन दिवस चार हत्तींचा कळप परिसरात वावरत आहे. पेडणेकर यांच्या शेतातील सुमारे तीन एकरातील ऊस हत्तीने खाऊन आणि धुडगूस घालून नुकसान केले. अर्ध्या एकरातील कापून पडलेले भात विस्कटून टाकले. आज सायंकाळी पेडणेकर, त्यांचा मुलगा व मुलगी नुकसानीचे फोटो काढण्यासाठी शेताकडे गेले होते. त्याच वेळी शेतात हत्ती असल्याचे पाहून ते घाबरले. त्यांची चाहूल लागताच एका हत्तीने त्यांच्या दिशेने चाल केली.
हेही वाचा- सांगलीत पदवीधर निवडणुकीच्या हालचाली गतिमान
पेडणेकर यांचा मुलगा व मुलगी उसात पळून गेले. घरासमोर बांधलेल्या गायीवर हत्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून पेडणेकर यांनी ध्वनिवर्धक सुरू केला. त्या आवाजाने बिथरलेला हत्ती माघारी परतला. दरम्यान, हत्तीचा शेतातील रोजचा वावर असल्याने पेडणेकर कुटुंबीय धास्तावले आहेत.
संपादन- अर्चना बनगे