आयटीआय वसतिगृहात "आपत्कालीन कारागृह'

आयटीआय वसतिगृहात "आपत्कालीन कारागृह'

कोल्हापूरः कोरोना पार्श्‍वभूमीवर नव्याने दाखल होणाऱ्या बंदीसाठी आयटीआय मुलांचे वसतिगृहात आपत्कालीन कारागृह सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. दोनशे बंदीची क्षमता येथे असून त्याच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. येत्या 15 दिवसांत हे काम पूर्ण होईल. 
कोरोनाचा संसर्ग राज्यभरातील काही कारागृहात पोहचला. तशी कारागृहातील बंदीची गर्दी कमी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. न्यायालयाच्या परवानगीने सात वर्षांच्या आतील शिक्षा असणाऱ्या बंदींना पॅरोलवर, तर कच्च्या बंदींना जामिनावर सोडण्यास हिरवा कंदील मिळाला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बिंदू चौक सबजेल रिकामे करून तेथील बंदीना कळंबा कारागृहात स्वतंत्र विभागात हलवले. नव्याने येणाऱ्या बंदीची तपासणी करूनच बिंदू चौक सबजेलमध्ये सध्या प्रवेश दिला जातो. मात्र, 125 बंदी राहतील, अशीच त्याची क्षमता आहे. नव्याने दाखल होणारे बंदी वाढत आहेत. त्याचा विचार करून कारागृह प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपाच्या कारागृहाची मागणी करण्यात आली होती. त्याला मंजुरी देताना लाईन बाजार येथील सैनिक स्कूल व आयटीआय मुलांचे वसतिगृह, असे दोन पर्याय देण्यात आले होते. यातील कळंबा कारागृहापासून जवळ असणाऱ्या आयटीआय वसतिगृहाची निवड करण्यात आली. वसतिगृहातील पहिला व दुसरा मजल्यावर आपत्कालीन कारागृह सुरू करण्यात येणार आहे. येथील डागडुजीच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरवात केली आहे. चारीही बाजूने हे वसतिगृह बंदीस्त स्वरूपाचे आहे. 

आपत्कालिन कारागृह... 
-वसतिगृहाचा पहिला व दुसरा मजला राखीव 
- 200 बंदीची क्षमता 
- नव्या बंदीची वैद्यकीय तपासणी करूनच प्रवेश 
- बंदीची संख्या वाढल्यास वसतिगृहातील किचनचा वापर 

-- 
"आयटीआय' मुलांच्या वसतिगृहात "आपत्कालिन कारागृह' सुरू होत आहे. नव्याने येणारे बंदी येथे ठेवले जातील. येथे आवश्‍यक सुविधा कारागृह प्रशासन पुरवते. मात्र, येथील बंदीच्या सुरक्षिततेची सर्व जबाबदारी ही पोलिस प्रशासनाकडे राहील. 
शरद शेळके, अधीक्षक, कारागृह.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com