esakal | निपाणीत होणाऱ्या गृहप्रकल्पासह आता रोजगारनिर्मितीही
sakal

बोलून बातमी शोधा

employment generation is done in nipani with the help of project of home in belgaum

२ हजार ५४ घरांची निर्मितीचे नियोजन असणाऱ्या प्रकल्पानजीक रोजगार निर्मितीसाठी गारमेंट कारखानेही उभारले जातील.

निपाणीत होणाऱ्या गृहप्रकल्पासह आता रोजगारनिर्मितीही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी (बेळगाव) : घरापासून वंचित असणाऱ्यांसाठी राजीव गांधी हौसिंग महामंडळ व पालिकेच्या सहकार्याने गृहप्रकल्पाची निर्मिती होत आहे. येथे २ हजार ५४ घरांची निर्मितीचे नियोजन असणाऱ्या प्रकल्पानजीक रोजगार निर्मितीसाठी गारमेंट कारखानेही उभारले जातील. गृहप्रकल्पासह रोजगारनिर्मिती हे प्रकल्पाचे वैशिष्ट्य असेल.

२०२२ पर्यंत घरकुलापासून कुणी वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून गृहप्रकल्प होत आहे. पहिल्या टप्प्यात शिंदेनगर परिसरात २० युनिटमध्ये २४० घरांचा प्रकल्प होईल. एका युनिटमध्ये ‘जी प्लस २‘ स्वरुपाच्या १२ घरे असतील. एकूण प्रकल्पात १७१ युनिट आहेत. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर एकूण १४१ फ्लोअर असतील.

हेही वाचा - ऐन दिवाळीत त्यांच्यावर काळाने घातला घाला ; दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू -

शिंदेनगराशिवाय उर्वरित प्रकल्पांची निर्मिती पट्टणकुडीनजीक सर्व्हे नंबर २९/२-बी, ३०/ ३ अ ३२ आणि यमगर्णीजवळील ८९/२ या जागी होईल. १२८ कोटी ७९ लाख व १७ कोटी ६७ लाख अशा दोन निविदांतर्गत १४६ कोटी ४६ लाखांचा प्रकल्प आहे. 
प्रकल्पस्थळ शहराबाहेर २ ते ३ किलोमीटरवर आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांना रोजगारासाठी शहरात यावे लागू नये, यासाठी प्रकल्पानजीक गारमेंटसह अन्य लघुउद्योग उभारण्याची घोषणा महिला आणि बालकल्याणमंत्री शशिकला जोल्ले यांनी केली आहे. त्यामुळे गृहप्रकल्पासह रोजगारनिर्मिती हे प्रकल्पाचे वेगळेपण असेल.

प्रकल्पातील  सुविधा

प्रकल्प कार्यक्षेत्रात भुयारी गटारी (युजीडी) योजना राबविली जाईल. प्रशस्त रस्ते, प्रत्येक युनिटमध्ये सुशोभीत व सुविधांनी युक्त उद्याने, ठिकठिकाणी कचराकुंड्या आणि पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ असतील. प्रत्येक घरकुलासाठी स्वतंत्र शौचालय व बाथरूम असेल.

हेही वाचा - सासऱ्याच्या कार्याला जातो म्हणून सांगून गेला ; तीन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला -

"घरकुलासह लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांची व विशेषतः महिलांची रोजगारासाठी भटकंती होऊ नये, यासाठी तेथे गारमेंट उभारले जातील. त्यामुळे शेकडो महिलांना रोजगार मिळेल. राज्यातील हा आदर्श गृहप्रकल्प ठरेल, असा विश्‍वास आहे."

- शशिकला जोल्ले, महिला आणि बालकल्याणमंत्री

संपादन - स्नेहल कदम