
डॉ. अनिकेत मोहिते यांचा ध्यास; अत्याधुनिक उपचारांचे कॅनडातून घेतले प्रशिक्षण
कोल्हापूर : रक्तातील गाठीच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांबाबत जगभरात संशोधन होत आहे. अस्थिमज्जा प्रत्यारोपणातून हा कर्करोग बरा होण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, काही रुग्णांवर हे उपचार परिणामकारक ठरत नाहीत किंवा काही महिन्यांनी, वर्षांनी तोच आजार डोके वर काढतो. अशा रुग्णांमधील विशिष्ट जणुकांना लक्ष्य करून कर्करोग शरीरातून नष्ट करण्याची उपचारपद्धती कोल्हापुरातील एका डॉक्टरांनी आत्मसात केली आहे. त्यांचे नाव आहे डॉ. अनिकेत मोहिते. कॅनडा येथील ब्रिटिश कोलंबिया कॅन्सर सेंटरमधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
या प्रशिक्षणाबाबत ते सांगतात, ‘‘शरीरात कर्करोगाच्या रक्ताच्या गाठी असल्या तर त्याची बायप्सीतून निदान करून किमोथेरपीच्या माध्यमातून विशिष्ट औषधे आणि इंजेक्शनाच्या वापरातून या गाठी विरघळतात. काही जणांचे आजार असे असतात की त्याला प्रतिसाद देत नाही. किंवा त्यांना तोच आजार पुन्हा उद्भवतो. त्यांना पुन्हा उपचार देऊन हा आजार शरीरातून नष्ट करण्यासाठी आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. अस्थिमज्जा प्रत्यारोपणातून शरीरातील पूर्वपेशी संकलित कराव्या लागतात. रक्तातून हे स्टेम सेल्स संकलित करता येऊ शकतात. अस्थिमज्जेतील स्टेम सेल्स संकलित करताना ते घटक रक्तात रूपांतरित करून रुग्णांना प्रभावी स्वरूपातील किमोथेरपी देऊन अशा रुग्णांना आजारमुक्त करणाऱ्या या उपचार पद्धतींचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण घेतले आहे.’’
हेही वाचा- प्रचाराची वेळ संपली आहे आणि तुम्ही आता असे चिन्ह दाखवू शकत नाही'
रक्तातील कर्करोग, अस्थिमज्जा प्रत्यारोपणातील पदव्युत्तर परीक्षा
डॉ. मोहिते यांनी टाटा मेमोरिअल कॅन्सर सेंटरमध्ये अस्थिमज्जा प्रत्यारोपण प्रशिक्षण परीक्षेत ‘फेलोशिप इन बोन मॅरो’ ही पदवीही संपादन केली आहे. नाशिकमधील आरोग्य विद्यापीठाने घेतलेल्या डॉक्टर ऑफ मेडिसीन हेमेटॉलॉजी (रक्तविकार) ही परीक्षाही त्यांनी उत्तीर्ण केली. डॉ. अनिकेत मोहिते कोल्हापुरात प्रौढ, बाल रक्तविकार व अस्थिमज्जा फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. या विकारातील रुग्णांवर गुंतागुंतीच्या व क्लिष्ट स्वरूपाच्या शस्त्रक्रिया व उपचार करून त्यांचे आरोग्य सुरळीत ठेवण्याचे काम करीत आहेत. रक्तातील कर्करोग, अस्थिमज्जा प्रत्यारोपण प्रशिक्षण अभ्यासक्रमात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदव्युत्तर परीक्षा पूर्ण करणारे डॉ. मोहिते एकमेव आहेत.
संपादन- अर्चना बनगे