आखाडा नसला तरी घुमतोय शड्डू

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

सराव सुरू असला तरी मॅटची अनुपलब्धता त्यांना जाणवत आहे. प्रबोधिनीतल्या आखाड्यात मॅटची कमतरता नाही. मॅटवरच्या लढतींचा अनुभव त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. परिणामी प्रबोधिनीचे दरवाजे कधी खुले होणार, अशी विचारणा त्यांच्यातून होत आहे.

कोल्हापूर : कोरोनाची संचारबंदी लागू झाल्यानंतरही जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडाप्रबोधिनीतील पैलवानांच्या सरावाला ब्रेक लागलेला नाही. व्हॉटस-ऍप ग्रुपद्वारे त्यांच्या डावपेचांचा पाठ आजही सुरू आहे. 18 पैलवान प्रबोधिनीतल्या आखाड्यात नसले तरी त्यांचा शड्डू त्यांच्या घरात घुमत आहे. नोव्हेंबरनंतर प्रबोधिनीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले होण्याची शक्‍यता आहे. 
कोल्हापुरातील सात, उस्मानाबाद तीन, सातारा व लातूर प्रत्येकी दोन, तर अकोला, ठाणे, नाशिक व सांगलीतील प्रत्येकी एका पैलवानाचा त्यात समावेश आहे. मार्चमध्ये संचारबंदी लागू झाल्यानंतर ते आपापल्या गावी परतले. मार्गदर्शक प्रवीण कोंडावळे यांनी तत्काळ त्यांचा व्हॉटस-ऍप ग्रुप बनविला. त्याद्वारे रोजच्या सरावाबद्दल मार्गदर्शन सुरू केले. ते आजही कायम असून, पैलवान गावातल्या मातीत घाम गाळत आहेत. 
प्रबोधिनीतले पैलवान मॅटवरच्या लढतीत सहभागी होत असल्याने त्यांच्या प्रशिक्षणाचे तंत्र ठरलेले असते. स्पर्धापूर्व प्रशिक्षणातून त्यांना डावेपच शिकविले जातात. यंदा कोरोनामुळे कुस्ती मैदाने बंद आहेत. कुस्ती अधिवेशन कधी सुरू होणार, हेही सांगता येत नाही. त्याबद्दल तक्रारीचा सूर न करता त्यांनी स्वत:ला सरावात झोकून दिले आहे. प्रबोधिनीत त्यांना त्यांच्या शारीरिक मेहनतीनुसार आहार दिला जातो. त्यात त्यांनी तडजोड करू नये, याची दक्षता कोंडावळे यांनी घेतली आहे. सराव सुरू असला तरी मॅटची अनुपलब्धता त्यांना जाणवत आहे. प्रबोधिनीतल्या आखाड्यात मॅटची कमतरता नाही. मॅटवरच्या लढतींचा अनुभव त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. परिणामी प्रबोधिनीचे दरवाजे कधी खुले होणार, अशी विचारणा त्यांच्यातून होत आहे. 

नोव्हेंबरमध्ये प्रबोधिनी सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर पैलवानांचा मॅटवरील सराव सुरू होईल. त्यांनी सरावात दुर्लक्ष करू नये, असा आमचा प्रयत्न राहिला आहे. स्पर्धेत पदके मिळवून त्यांनी कोल्हापूर क्रीडाप्रबोधिनीचे नाव उंचवावे, हीच आमची अपेक्षा आहे. 
- प्रवीण कोंडावळे, मार्गदर्शक, क्रीडाप्रबोधिनी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even though there is no field, wrestling practice continues