कोल्हापुरात सजली मैफल रंग-सुरांची ; 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून रसिकांचा सहभाग

संभाजी गंडमाळे
Sunday, 17 January 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा पहिल्यांदाच भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात मैफलीचे आयोजन झाले.

कोल्हापूर : अभिजीत भारतीय संगीत आणि चित्र व शिल्पाकृतींच्या साक्षीने आज 'मैफल रंग-सुरांची' सजली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा पहिल्यांदाच भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात मैफलीचे आयोजन झाले.

'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून रसिक या मैफलीत सहभागी झाले. ज्येष्ठ चित्रकर्ती व कलाशिक्षिका डॉ. नलिनी भागवत यांना यंदाच्या रंगबहार जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर, विश्‍वरंग विश्‍वनाथ नागेशकर यांच्या स्मृती जपण्यासाठी सलग त्रेचाळीसाव्या वर्षी हा उपक्रम झाला. ज्येष्ठ उद्योजक व्ही. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष धनंजय जाधव, इंद्रजीत नागेशकर, कार्यवाह संजीव संकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

हेही वाचा - इच्छुकांच्या धडपडीला ब्रेक : गोकुळ, केडीसीसी, ‘राजाराम’सह अन्य संस्थांचा समावेश-

डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, 'प्रत्येक कलाकाराने आपापल्या कलाकृतीतून भोवतालावर व्यक्त झाले पाहिजे. किंबहुना वर्तमानातील विविध घटना-घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर समीक्षेवर भर दिला पाहिजे. कलाकार ही समाजाची मोठा ताकद असून स्थानिक कलाकारांची एकत्रित माहिती नव्याने अपडेट केली पाहिजे.' डॉ. नलिनी भागवत यांनी त्यांचा एकूणच कला प्रवास उलगडला. कलाकारांनी चौफेर वाचनावरही भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

पुरस्कार वितरणानंतर मधुसूदन शिखरे यांच्या शास्त्रीय गायनाने मैफलीला प्रारंभ झाला. त्यांनी सुरवातीला 'मिया की तोडी' या प्रभातकालीन रागातील तीन बंदिशी सादर केल्या. त्यानंतर 'भिमपलास' रागातील तीन रचना सादर केल्या. त्यांना निखिलेश शिखरे (तबला), मयुरेश शिखरे (हार्मोनियम), निनाद खाडिलकर (तानपुरा) यांची साथ होती. त्याचवेळी चित्र व शिल्पही साकारू लागले. तीन तासाहून अधिक तास ही मैफल रंगली. 

शिखरे यांच्या स्वराभिषेकाबरोबरच ज्येष्ठ चित्रकार व माजी प्राचार्य जी. एस. माजगावकर यांनी कॅनव्हासवर निसर्गचित्र तर ज्येष्ठ चित्रकर्ती, माजी प्राचार्या श्रीमती अस्मिता जगताप यांनी अमूर्त शैलीतील निसर्गचित्र साकरले. शिल्पकार संजीव संकपाळ यांनी रा. शि. गोसावी कलानिकेतन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांचे शिल्प साकारले.

हेही वाचा - आरोग्य राज्य मंत्री राजेश पाटील यड्रावकर यांना पोलीसांनी बेळगावात अडवले -

कार्यक्रमाला सुहासिनी जाधव, प्राचार्य अजय दळवी, रियाज शेख, विलास बकरे, विजय टिपुगडे, अमृत पाटील, किशोर पुरेकर, उज्वल दिवाण, पार्श्‍वनाथ नांद्रे, प्रशांत जाधव, एस. निंबाळकर, अतुल डाके, सुरेश मिरजकर, मनोज दरेकर, मानसिंग टाकळे आदी उपस्थित होते. श्रीकांत डिग्रजकर यांनी स्वागत केले.  

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the event on facebook live maifilit rang suranchi participation online in this event in kolhapur