पन्हाळा-पावनखिंड मार्गाचा उलगडला रोमांचक इतिहास 

Exciting history of Panhala-Pavankhind route unfolded
Exciting history of Panhala-Pavankhind route unfolded

कोल्हापूर : पन्हाळा ते पावनखिंड मार्गावर घडलेल्या रोमांचक इतिहासाचे पदर आज येथे उलगडले गेले. बांदल मावळ्यांचे शौर्य, वीररत्न शिवा काशीद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान अन्‌ शिवछत्रतींनी विशाळगडच्या पायथ्याशी गाजवलेल्या पराक्रमाच्या स्मृती जाग्या झाल्या. निमित्त होते, पन्हाळा-पावनखिंड मध्यवर्ती समन्वय समितीतर्फे आयोजित "फेसबुक लाईव्ह' संवादाचे. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके व शिवशाहीर राजू राऊत यांनी दुर्गभ्रमंतीतील अनुभव सांगत इतिहासाची माहिती दिली. विनोद साळोखे व सागर पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली. 

यंदा कोरोनाच्या संकटामुळे पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम स्थगित केली. पदभ्रमंतीच्या स्मृतींना उजाळा देत रणसंग्रामाची माहिती इतिहासप्रेमींना व्हावी, यासाठी फेसबूक मुलाखतीचे आयोजन केले होते. या अंतर्गत दुर्ग भ्रमंतीत आयुष्य वेचणारे डॉ. अडके व शाहिरीच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा इतिहास जनमानसात पोचवणारे राऊत यांच्याशी संवाद साधण्यात आला. 

डॉ. अडके यांनी सिद्धी जौहरच्या वेढयातून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले नियोजन, हेरखात्याची भूमिका, शिवा काशीद यांचे बलिदान, सह्याद्रीच्या रांगांचा केलेला कल्पक वापर, युद्धासाठी बांदल सैन्याची केलेली निवड, चौकेवाडीत शत्रुसैन्याशी पडलेली बांदल मावळ्यांची गाठ, लढाईत वापरलेली शस्त्रे यांची माहिती दिली. तसेच फरसबंदीच्या मार्गाच्या संशोधनावरही प्रकाश टाकला. तसेच विशाळगडाच्या पायथ्याला शिवछत्रपतींनी गाजवलेल्या पराक्रम स्पष्ट केला. 

राजू राऊत यांनी शाहिरीतून शिवछत्रपतींचा इतिहास जागवला. त्यांनी पावनखिंडीतील रणसंग्राम जगातील गाजलेल्या युद्धांपैकी एक असून, या युद्धाला तोड नाही, असे सांगितले. या वेळी हेमंत साळोखे, साताप्पा कडव, सागर पाटील, शाहीर दिलीप सावंत, अजिंक्‍य जाधव, सागर पाडळकर, राजेश पाटील आदी उपस्थित होते. 

दृष्टिक्षेप 
- पन्हाळा-पावनखिंड मध्यवर्ती समन्वय समितीतर्फे फेसबुक लाईव्ह 
- कोरोनामुळे पदभ्रमंती मोहिम स्थगित 
- फरसबंदीच्या मार्गाच्या संशोधनावरही प्रकाश 
- शाहिरीतून जागवला शिवछत्रपतींचा इतिहास

संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com