
महापुराने शेती आणि घराचे मोठे नुकसान झाले. शासनाने यापोटी 95 हजारांची भरपाईदेखील दिली; मात्र या भरपाईची रक्कम कोरोनाच्या उच्चाटनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊन औरवाड (ता. शिरोळ) येथील बाळासाहेब रावण यांनी शेतकऱ्यांमधील दानत दाखवून दिली आहे.
जयसिंगपूर: महापुराने शेती आणि घराचे मोठे नुकसान झाले. शासनाने यापोटी 95 हजारांची भरपाईदेखील दिली; मात्र या भरपाईची रक्कम कोरोनाच्या उच्चाटनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊन औरवाड (ता. शिरोळ) येथील बाळासाहेब रावण यांनी शेतकऱ्यांमधील दानत दाखवून दिली आहे.
शेतीमालाला अशाश्वत हमीभाव, उत्पादन खर्चातील वाढ आदी कारणांनी शेतकरी वर्षानुवर्षे नुकसानीची शेती करत असूनही त्यांच्यातील मायेचा पाझर मात्र अटला नसल्याचेच हे प्रातिनिधिक उदाहरण यानिमित्ताने पाहायला मिळाले.
ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावांचे मोठे नुकसान झाले. महापुराने अनेकांची घरे आणि शेतीपिके वाहून नेली. यामध्ये औरवाडच्या बाळासाहेब रावण यांचाही समावेश आहे, मात्र नुकसानभरपाईपोटी मिळालेले 95 हजार रुपये मिळाले ते त्यांनी कोरोनाविरोधातील लढ्यासाठी दिले. नुकसानग्रस्त घराची त्यांनी स्वखर्चाने डागडुजी करून घेतली. रावण यांची तीन एकर शेती आहे. एक मुलगा अभियंता, तर दुसरा शेती करतो.
आता रकमेची खरी गरज इतरांना असल्याची त्यांची भावना होती. मुलगा संदीप, प्रदीप तसेच ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य प्रभावती रावण यांच्याशी चर्चा करून त्यांनी कोणताही गाजावाजा न करता 95 हजारांची रक्कम "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड 19' या खात्यात मंगळवारी (ता.28) वर्ग केली.
मानवतेचे दर्शन
बाळासाहेब रावण या शेतकऱ्याने कोरोनाविरोधातील शासनाच्या प्रयत्नाला बळ देण्याची भूमिका घेतली आहे. नुकसानभरपाईपोटी मिळालेले 95 हजार रुपये "मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोव्हीड 19' खात्यावर वर्ग केली आहे. यातून त्यांच्यातील मानवतेचे दर्शन घडले आहे.
- डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, तहसीलदार, शिरोळ
योगदान देण्याचा प्रयत्न
महापुराने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. मात्र, शासनाने त्यांना मदतीतून आधार दिला. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासन प्रयत्नांना आज प्रत्येक घटक योगदान देत आहे. त्याप्रमाणे आम्हीही नुकसानभरपाईची रक्कम पुन्हा शासनाला देऊन योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.
- बाळासाहेब रावण, शेतकरी, औरवाड