साहेब माझ्या मुलाचा स्वॅब घ्या, तो पण पॉझिटिव्ह आला तर सोयीच होईल...

सदानंद पाटील | Friday, 31 July 2020

कोरोनाबाधित बापाची अगतिकता; चौकोनी कुटुंबाची घालमेल

कोल्हापूर - ‘‘मी कोरोनामुळे रुग्णालयात आहे. घरात पत्नी, मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा आहे. पत्नी आणि मुलगीही पॉझिटिव्ह तर मुलगा निगेटिव्ह आला आहे. मुलगा दुसरीकडे राहणं शक्‍य नाही. नातेवाईकांकडे जायचे तर त्यांचे शेजारी तयार नाहीत. त्यामुळे ‘साहेब कृपा करून मुलाचा स्वॅब घ्या. दुर्दैवानं त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला तर किमान आम्हाला एकत्र तरी राहता येईल’’ अशी केविलवाणी विनंती केली आहे दुर्दैवी बापाने...

रंकाळा येथील अपार्टमेंटमधील चौकोनी कुटुंब. चार-पाच दिवसांपूर्वी कुटुंबातील प्रमुखाला लागण झाली. अपेक्षेप्रमाणेच अहवाल पॉझिटिव्ह आला. इतर आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. दुसऱ्या दिवशी संबंधित कुटुंबातील सदस्यांनी स्वॅब दिले. त्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला आणि संबंधित कुटुंबीयांसह सर्व अपार्टमेंटलाच धक्का बसला. कुटुंबातील सदस्यांना इतर कोणताच आजार नसल्याने सर्वांनीच घरातच उपचार करण्यास संमती दिली. मात्र प्रश्न आला तो मुलाचा. पाच वर्षांच्या मुलाला बाहेर, नातेवाईकांकडे राहण्याची सवय नाही. बहीण सोबत असेल तर तो राहतो. मात्र बहीणही बाधित आहे. वडीलही हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यामुळे मुलाला ठेवायचे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला.

वाचा - जन्मापासूनचे अंधत्व त्यात रोजची अडीच किलोमीटरची पायपीट... अन् मिळविले दहावीत 85 टक्के गुण 

मुलाची मावशी रत्नागिरी येथून येण्यासाठी तयार झाली; मात्र जिल्हा बंदी असल्याने तो मार्गही बंद झाला. रंकाळा येथील नातेवाईकांनी नेण्याची तयारी दर्शवली. मात्र, तेथील शेजाऱ्यांनी विरोध केला. यातूनच त्यांनी मुलाचा पुन्हा स्वॅब तपासण्याची विनंती केली. दुर्दैवाने मुलाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला तर किमान त्याला सर्वांसोबत राहता येईल, अशी मन सुन्न करणारी मागणी या मुलाच्या पालकांनी केली.

शेजारी आले धावून...

सध्या हा पाच वर्षांचा मुलगा आई आणि बहिणीसोबत राहत आहे. त्याची व्यवस्था स्वतंत्र खोलीत आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात त्याला स्वतंत्र राहण्याची वेळ आली आहे. शेजारी प्रामाणिक धर्म सांभाळत कुटुंबाला मदत करत आहेत. मुलाचा जेवणाचा डबा शेजारी देत आहेत. मात्र, हे असे का चालले आहे, याची कल्पना मात्र या चिमुकल्याला नाही.

संपादन - मतीन शेख