तृतीयपंथीयांच्या जीवनावर लॉकडाउनमध्ये साकारला चित्रपट

 Sakarli Festival Film in Lockdown
Sakarli Festival Film in Lockdown

कोल्हापूर  ः "हे देवा तुझ्या दाराला शिरं मारलं तुझ्या...पुढचा जन्म किड्या-मुंग्यांचा, कुत्र्या-मांजरांचा दे, पण जोगत्याचा देऊ नकोस...जोगत्याचा दिलास तर कलाकाराचा देऊ नकोस...कलाकाराचा जन्म लय वंगाळ...' हा संवाद आहे "परसूअक्का' या चित्रपटातील. लॉकडाउनच्या काळात स्थानिक कलाकारांची मोट बांधून सचिन चौगले आणि त्यांच्या टीमनं ही फेस्टिव्हल फिल्म साकारली असून लवकरच ती पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. तृतीय पंथीयांच्या विविध प्रश्‍नांवर भाष्य करत ती प्रस्थापित व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे. 
तृतीय पंथीयांच्या प्रश्‍नांवर "जोगवा', "कथा नाम्या जोग्याची..' या अलीकडच्या काळातील कोल्हापूरच्या मातीतील कलाकृती. पण, त्याच्याही पुढे जाऊन सचिनने या प्रश्‍नाला भिडण्याचा प्रयत्न केला आहे. तृतीयपंथीसुद्धा माणसचं आहेत; पण अजूनही त्यांच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलेलेली नाही. ही माणसं आपलं जगणं आनंददायी करण्यासाठी विविध कला सादरीकरणात रममाण असतात; पण त्यामागच्या नेमक्‍या वेदना काय असतात, यावर हा चित्रपट भाष्य करणार आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरातच त्याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून सध्या संकलनाचे काम सुरू आहे. 
सचिन हा तसा हरहुन्नरी माणूस. मैलखड्डा परिसरातील झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला. उत्तम अभिनय, घोडेस्वारी, मर्दानी खेळ, नेमबाजीतही तो पारंगत आणि सर्पमित्र म्हणूनही त्याची ओळख. आजवर त्याने एकशे चाळीसहून अधिक विविध जातीचे साप आणि मगरी पकडून त्यांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. शहरातील निराधार माणसं असोत किंवा जनावरं यासाठीही सचिनचं अख्खं कुटुंब आजही काम करते. गेली आठ ते दहा वर्षे तो सिनेक्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण करतो आहे. चांगली नोकरी सोडून तो या क्षेत्रात धडपडतो आहे. अर्थातच घरच्यांची पूर्ण साथ आहे. "शिवा' या झोपडपट्टीतील मुलांच्या भावविश्‍वावर आधारित लघुपटापासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता पूर्ण लांबीच्या चित्रपटांपर्यंत पोचला आहे. अलीकडच्या काळात "माणसा' हा चित्रपट त्याने केला. त्यासाठी "पीएमसी' प्रॉडक्‍शन्सचे सहकार्य मिळाले. लवकरच "नाद शर्यतीचा' ही अनोखी मालिकाही तो रसिकांसमोर आणणार आहे. 
"परसूअक्का' या चित्रपटाचे निर्माता काळूराम ढोबळे असून त्यांच्यासह गोपी वर्णे, बाळासाहेब देसाई, प्रवीण आयरे, आशुतोष नारकर, आनंद शिंदे, चंद्रकांत लोंढे, तेशवानी वेताळ, साक्षी चौधरी आदींच्या भूमिका आहेत. अर्थातच बहुतांश टीम ही कोल्हापूरची आहे. प्रतीक पाटील यांचे गाणं चित्रपटात आहे. तर मोहन गिरी कॅमेरामन आहेत. पत्नी मंजिरी चौगले, मोनिका सूर्यवंशी, पांडुरंग सावखेर, संदेश लोंढे यांचे विशेष सहकार्य मिळत असल्याचे तो सांगतो. 


आमची काम करण्याची विशिष्ट पद्धत आहे. संपूर्ण टीममधील प्रत्येक सदस्याला येथे समान वागणूक मिळते. चांगली कथा आणि झपाटून काम करण्याची वृत्ती यामुळे आमच्या टीमला सर्वांचेच नेहमी सहकार्य मिळते आहे. 
- सुनील चौगले, लेखक व दिग्दर्शक

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com