थकित पीक कर्ज भरा; आज आहे शेवटचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भरपाईपोटीची रक्कम जमा झालेली नाही.
 

कोल्हापूर : गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भरपाईपोटीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची जिल्हा बॅंकेकडील कर्ज खाती थकबाकीत गेली आहेत, अशा शेतकऱ्यांना ही थकबाकी भरल्यावरच नवे कर्ज उपलब्ध होणार आहे. थकित कर्ज भरण्यासाठी उद्या (ता. 30) शेवटचा दिवस आहे. 
दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामातील कर्ज पुरवठा करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज जिल्हा बॅंकेत झालेल्या संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. या शेतकऱ्यांची कर्ज खाती रिकामी न झाल्याने त्यांना ही मुदत देण्यात आली आहे. 

गेल्यावर्षी कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसला. या तिन्हीही जिल्ह्यातील नदीकाठची पिके वाया गेली. अशा शेतकऱ्यांना भरपाईपोटी प्रती हेक्‍टर 1 लाख रूपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. जिल्ह्यात असे 6 हजार 637 शेतकरी आहेत, त्यांच्या भरपाईपोटी जिल्हा बॅंकेला 13 कोटी रूपये जमा होणार होते. तथापि गेल्या तीन महिन्यापासून कोरोनाचा राज्यात प्रादुर्भाव वाढल्याने ही रक्कम शासनाकडून जमा झालेली नाही. परिणामी या शेतकऱ्यांची कर्जखाती थकित झाली. 

खरीप हंगामातील कर्जाचा जमा-खर्च करण्याचा उद्या (ता. 30) शेवटचा दिवस आहे. तत्पुर्वी या शेतकऱ्यांनी आपल्या नावांवरील कर्ज भरले तर त्यांना नव्या हंगामासाठी पीक कर्ज उलब्ध होणार आहे. हे कर्जही देण्याची उद्या (ता. 30) अंतिम मुदत होती. तथापि आज झालेल्या संचालकांच्या बैठकीत या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास मुदतवाढ देण्याची मागणी सर्वच संचालकांनी केल्यानंतर त्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे. शासनाकडून येणे असलेली रक्कम जमा दाखवून ही खाती थकबाकीतून बाहेर काढण्याची मागणी होती, तथापि त्यावर निर्णय झाला नाही. 

अनामत रक्कम जमा होणार 
अतिवृष्टीग्रस्त बहुंताश शेतकरी हे करवीर, शिरोळ व हातकणंगले तालुक्‍यातील आहेत. या शेतकऱ्यांचा बाधित क्षेत्रा व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील ऊसाचे कारखान्यांनी जमा केलेले पैसे बॅंकेत अनामत म्हणून जमा आहेत. उद्या ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग करून त्यांची खाती थकबाकीतून बाहेर काढण्यात येणार असल्याचे समजते. 

भाजपाचा आंदोलनाचा इशारा 
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या संयुक्त खात्यावरील भरपाई जमा झालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना नवे कर्ज मिळणार नाही, अशा शेतकऱ्यांच्या कर्जातून महापुराची भरपाई जमा करून उर्वरित रक्कम शेतकरी भरण्यास तयार आहेत. या अटीवर या शेतकऱ्यांना कर्ज द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपाच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First, pay the arrears, then the new pickers ...