शिवाजी विद्यापीठात मत्स्यशेतीचा प्रयोग

ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

विद्यापीठाने नाट्यशास्त्र विभागामागील तलावात आणि विद्यापीठाच्या दक्षिणेकडील तलावात मत्स्यबीज सोडले आहे. या ठिकाणी कटला, रोहू, ग्रासवर्क या प्रकारच्या माशांचे बीज तलावात सोडण्यात आले आहे

कोल्हापूर :  जलयुक्त शिवाजी विद्यापीठात आता मत्स्यशेतीचा प्रयोग करण्यात आला आहे. या अंतर्गत विद्यापीठ परिसरातील दोन तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्यात आले. लवकरच आता येथे मस्त्यशेती सुरू होईल. यामुळे विद्यापीठाला उत्पन्नाचे नवे साधन मिळालेच ;पण तळ्यातील मासे पक्षांचे खाद्य असल्याने येथे पक्षीही मोठ्या संख्येने येतील. 
एकेकाळी विद्यापीठात आवश्‍यकते एवढे पाणीही नव्हते. मात्र, तत्कालीन कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे आणि उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या कल्पनेतून विद्यापीठात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आली. यातून विद्यापीठात विहिरी, शेततळी, तलाव बांधण्यात आले. यामुळे जलयुक्त विद्यापीठ अशी नवी ओळख विद्यापीठाला मिळाली. या तलावांमुळे पाण्याची उपलब्धता वाढलीच; पण विद्यापीठ परिसराचे नैसर्गिक सौंदर्यही खुलले. यामुळे विद्यापीठातील जैवविविधताही वाढली. येथिल तळ्यात विविध प्रकारचे मासे आहेत. याशिवाय काही पाणवनस्पती आणि पक्षीही येथे पहायला मिळतात. आता विद्यापीठाने येथे आणखी एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यापीठाने नाट्यशास्त्र विभागामागील तलावात आणि विद्यापीठाच्या दक्षिणेकडील तलावातमत्स्यबीज सोडले आहे. या ठिकाणी कटला, रोहू, ग्रासवर्क या प्रकारच्या माशांचे बीज तलावात सोडण्यात आले आहे. हे मासे मोठे झाल्यावर त्यांची विक्री केली जाईल. यासाठीचे निवदाही देण्यात आली आहे. माशांमुळे विद्यापीठातील तलावातील पाण्याची नैसर्गिक स्वच्छता होते. तसेच या तलावांवर येणाऱ्या पक्षांना खाद्यही उपलब्ध होते. माशांमुळे या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षीही येतात. त्यामुळे विद्यापीठात होणारी मस्त्यशेती ही सर्वांगीण दृष्टीकोनातून फायदेशीर ठरणार आहे. 
 
मत्स्यशेती ही विद्यापीठाला आर्थिक उत्पन्न मिळवून देईलच; पण येथील जैवविविधतेच्या दृष्टीनेही ती उपयुक्त ठरणार आहे. लवकरच विद्यापीठाच्या या दोन तलावात मशांचे विविध प्रकार पहायला मिळतील. त्यामुळे येथे पक्षीही येतील. 
- प्रा. एकनाथ काटकर, मत्स्यशेती तज्ज्ञ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fisheries Experiment at Shivaji University