शासनाचे नियम पाळणार, शुक्रवारी त्र्यंबोली यात्रा करणार 

संभाजी गंडमाळे 
बुधवार, 15 जुलै 2020

शासनाचे सर्व नियम पाळत आजही त्र्यंबोली यात्रा साध्या पद्धतीने साजरी झाली. आषाढातील हा शेवटचाच आठवडा असल्याने आज बहुतांश तालीम संस्थांनी यात्रा साजरी केली.

कोल्हापूर : शासनाचे सर्व नियम पाळत आजही त्र्यंबोली यात्रा साध्या पद्धतीने साजरी झाली. आषाढातील हा शेवटचाच आठवडा असल्याने आज बहुतांश तालीम संस्थांनी यात्रा साजरी केली. शुक्रवारी (ता. 17) यात्रेसाठी शेवटचा दिवस असल्याने या दिवशी उर्वरित सर्व तालीम संस्था यात्रा साजरी करणार आहेत. मात्र, सर्वच तालमींतर्फे यंदा मिरवणुकांना फाटा देऊन तालमीतच विविध धार्मिक विधी होणार आहेत. 

टेंबलाई टेकडीवर अधिक गर्दी होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. आज मंदिर परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेडस्‌ लावून प्रवेश बंद केला. तालीम संस्थांनीही अगदी मोजक्‍याच लोकांना मंदिरात विविध विधींसाठी पाठवले. टीए बटालियन, वाहतूक पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे कालच विविध धार्मिक विधी झाले. 

ओल्या नैवेद्यापेक्षा कोरडा शिधा त्यांनी मंदिरातील पुजाऱ्यांकडे दिला. मंदिरात ओला नैवेद्य अर्पण करण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण तुलनेत कमी असले तरी आता कोरडा शिधा देणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, पुढील काही महिने हाच पर्याय भाविकांकडूनही स्वीकारला जाईल, असे सकारात्मक चित्र आता पुढे येत असल्याचे प्रदीप गुरव यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेप 
- आषाढातील शेवटचा आठवडा 
- बहुतांश तालीम संस्थांची त्र्यंबोली यात्रा झाली 
- उर्वरीत तालीम शुक्रवारी यात्रा करणार 
- टेंबलाई टेकडीवर बॅरीकेड्‌स लावून प्रवेश बंद 
- ओल्या नैवेद्यापेक्षा, कोरडा शिधा दिला 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: follow the rules and will travel to Trymboli on Friday