फुटबॉलपटूंनी काढली मैदानावरील तीन ट्रॉली खडी

The Footballers Clean Ground In Gadhinglaj Kolhapur Marathi News
The Footballers Clean Ground In Gadhinglaj Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : दुखापतींचा वाढणारा त्रास लक्षात घेऊन पंधरा वर्षाखालील फुटबॉलपटूनीच मैदानाची डागडूजी केली. म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी खडी पसरण्यात आली होती. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलच्या खेळाडूंनी दोन दिवस सराव बंद करून श्रमदानातून तब्बल तीन ट्रॉली खडी काढली. या मैदानाच्या देखभालीकडे कायमस्वरूपी लक्ष देणारी यंत्रणा आवश्‍यक असल्याचे या ठिकाणी सराव करणाऱ्या स्थानिक परिीसरातील खेळाडूंची मागणी आहे. 

गडहिंग्लजला क्रीडा क्षेत्राची मोठी परंपरा आहे. खासकरून अथलेटिक्‍स आणि फुटबॉल या खेळात येथील खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली आहे. शहरात असणाऱ्या खेळाडूंच्या संख्येच्या तुलनेत मैदानांची संख्या अपुरी आहे. शिवराज महाविद्यालय आणि एम. आर. हायस्कूलचे मैदान अशी दोन मोठी मैदाने आहेत. पालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै विद्यालय, म.दु.श्रेष्ठी विद्यालय, काळू मास्तर विद्यालय या छोट्या मैदानांचाही त्या त्या परिसरातील खेळाडू, संघांना मोठा आधार आहे. त्यामुळे सर्वच लहान मोठ्या मैदानावर सरावासाठी खेळाडूंची सकाळी आणि सायंकाळी मोठी गर्दी असते. 

निवडणुकीच्या प्रचारासाठी बहुतांशी वेळा मैदानांचा आधार घेतला जातो. दरम्यान, श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर विधानसभा निवडणुकीसाठी दोन सभा झाल्या. यावेळी असणाऱ्या परतीच्या पावसामुळे संयोजकांनी मैदानावर दगडी खडी आणि चुरा पसरला. सभेनंतर मात्र ती खडी आणि चुरा काढला गेला नाही. परिणामी, खेळाडूंनी धोका पत्करूनच सराव सुरू ठेवला. यातुन मैदानावर पडल्यावर दगडी खडी आणि टोकदार चुऱ्यामुळे दुखापतीचे प्रमाण वाढले. या मैदानावरच श्रेष्ठी विद्यालय आणि झाकिर हुसेन विद्यालयाचे लहान विद्यार्थी दिवसभर वावरतात. त्यांनाही या खडीचा मोठा फटका बसत होता. 
अडीच महिन्यानंतरही खडी काढण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याने रोजच अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे युनायटेड स्कूलच्या वीस खेळाडूंनी दोन दिवस सराव बंद करून श्रमदानाद्वारे ही खडी बाजूला केली. खोरी, बुट्ट्या घेऊन सर्व मैदानावरील खडी उचलुन शाळेच्या मागे टाकण्यात आली. सुमारे तीन ट्रॉली खडी बघता बघता गोळा झाली. युनायटेड फुटबॉल स्कूलच्या कुमार फुटबॉलपटूना मैदानावर सराव करणाऱ्या क्रिकेट खेळाडूनीही त्यांना मदत केली.

शहरातील मध्यवर्ती म्हणून श्रेष्ठी विदयालयावर विविध कार्यक्रम होतात. परंतु, संयोजक मंडपासह इतर कामासाठी मैदानावर खड्डे काढून मैदानाची दुरावस्था करतात. त्यामुळे कार्यक्रमानंतर अशा सयोजकांकडून मैदान दुरुस्त करून देण्याची नगरपालिकेने अट लावावी, अशी स्थानिक खेळाडूंची मागणी आहे. 

खडी दुसऱ्यांदा दूर केली 
युनायटेड फुटबॉलच्या खेळाडूंनी दीपावली सुट्टीत अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेसाठी एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर खडी दूर करण्यासाठी तब्बल आठवडाभर पदरमोड करून ट्रॅक्‍टरच्या मदतीने श्रमदान केले. परंतु, निवडणूक यंत्रणेने मोठ्या प्रमाणात खडी टाकल्याने ती पूर्णता काढता आलेली नाही. आजही खेळाडूंना दुखापती सहन करतच सराव करावा लागतो आहे. पाठोपाठ श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर युनायटेड स्कूलच्या कुमार खेळाडूंना खडी दूर करण्याची ही दुसरी वेळ आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com