नरकेप्रेमी कार्यकर्त्यांना बाकी 9 नंबर आहे भलताच लकी

Former MLA Chandradeep Shashikant Narke vehicle story by sandeep khandekar
Former MLA Chandradeep Shashikant Narke vehicle story by sandeep khandekar

कोल्हापूर : पायाला भिंगरी कशी बांधायची, हे या नेत्याला सांगावं लागत नाही. यांचं शिक्षण बी. ई. सिव्हिलपर्यंतचे. आंदोलनातला हा आक्रमक चेहरा. करवीर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलंय. त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट आहे. रोज सकाळी रंकाळ्याला यांची प्रदक्षिणा चुकत नाही. मामला निवडणुकीच्या प्रचाराचा अथवा अधिवेशनाचा असेल तरच प्रदक्षिणेला सुटी. मतदारसंघातील एखाद्या कुटुंबातील सुख-दु:खाची कोणतीही घटना असो, त्यांच्या उंबऱ्याला पाय लावल्याशिवाय यांना चैन पडत नाही. माजी आमदार चंद्रदीप शशिकांत नरके राजकारणातला वेगळा चेहरा. ११८८ अन्‌ नरके यांचं समीकरण अतुट आहे. त्यावर कार्यकर्त्यांचा जीव आहे. नेत्याच्या प्रेमापोटी हाच नंबर घेण्यात त्यांना भलताच इंटरेस्ट असल्याचे चित्र आहे.

शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात नरकेवाडा. माजी आमदार नरके यांचे हे निवासस्थान, तर कार्यक्षेत्र करवीर विधानसभा मतदारसंघ. सुमारे १२१ गावांचा समावेश. प्रत्येक गावात जनसंपर्क हे त्यांचे वैशिष्ट्य. या गावांत ११८८ ची नाळ जोडली गेली आहे. या अंकाची बेरीज नऊ येते. हा अंक नरके यांना लकी ठरलाय. निवडणूक विधानसभेची असो की कारखान्याची; या नंबरने साथ दिल्याची त्यांची भावना आहे. पेठेतल्या खिलाडूवृत्तीचे गुण त्यांच्या नसानसात आहेत. फुटबॉल हा त्यांचा आवडता खेळ. मध्य फळीतले ते उत्कृष्ट खेळाडू. शिवाजी तरुण मंडळातून त्यांनी त्यांचे स्किल सादर केले. शहराप्रमाणेच ग्रामीण भागात त्यांच्या मित्रपरिवाराचा गोतावळा मोठा आहे. त्यांच्यातही या नंबरची चर्चा नेहमी होते. 


करवीर विधानसभा मतदारसंघातून २००९ मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली. प्रचाराच्या रणधुमाळीसाठी ११८८ गाडी गावागावांत पोचली. विजयाचा गुलाल त्यांच्या अंगावर पडला. तसा हा नंबर कार्यकर्त्यांत चर्चेचा ठरला. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले. दहा वर्षांच्या कार्यकाळात ११८८ हा नंबर कार्यकर्त्यांना भुरळ घालणारा ठरला. कोल्हापूर टोल, महाराष्ट्र एकीकरण, शाहू मिल खासगीकरण, कोल्हापूर खंडपीठ, एल.बी. टी, एम. एस. ई. बी. व हद्दवाढविरोधी आंदोलनात त्यांची गाडी पुढे राहिली.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ लिमिटेडचे (मुंबई) संचालक, कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना व कुंभी कासारी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, कुंभी कासारी शिक्षण समूहाचे संचालक, कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर स्विमिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशनचे (क्रेडाई) सदस्य ही पदे त्यांच्या वाट्याला आली. कार्याचा परीघ वाढत असताना गाडीचा नंबरही अनेकांच्या लक्षात राहणारा ठरला. अमित पाटील, अनिल पाटील, संजय पाटील, अंबाजी पाटील या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर ११८८ नंबरला स्थान मिळाले आहे.

संपादन -  अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com