रोजगाराचे चक्र बिघडले...चार दिवस काम, तीन दिवस सुटी... 

four days work, three days leave ...
four days work, three days leave ...

इचलकरंजी : कोरोनाचा विळखा आता रोजंदारीला घट्ट बसत चालला आहे. कधी कारखाने सुरू तर कधी बंद. चार दिवस काम आणि तीन दिवस सुटी, अशा अवस्थेत कामगारांच्या रोजगाराचे चक्र सुरू आहे. यामुळे कामगारांची आर्थिक घडी विस्कटली असून जगणे अस्थिर झाले आहे. कोरोनाच्या या भयावह परिस्थितीत रोजगाराचे भविष्यच अडचणीत आले आहे. 

कोरोनामुळे पाच महिन्यांपासून जनजीवन विस्कळित झाले आहे. शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अनेकांचे कुटुंब रोजंदारीवर चालते; पण कोरोनामुळे अशा कुटुंबांना आर्थिक झळा सोसाव्या लागल्या आहेत. व्यवसाय, कारखाने ठप्प झाल्याने आपोआप रोजगारामध्ये अनियमितता येऊ लागली आहे. ग्रामीण भागातील कामगारवर्ग आसपासच्या औद्योगिक वसाहतीत रोजंदारीसाठी जातो. या औद्योगिक वसाहतीची धडधड कोरोनामुळे थंडावल्याने याचा परिणाम येथे काम करणाऱ्या कामगारांवर झाला; पण जगण्याच्या लढाईत रोजंदारीसाठी कामगारांची धडपड सुरूच आहे. 

औद्योगिक वसाहतींमध्ये उत्पादित मालाच्या मागणीनुसार कारखाने सुरू आहेत. कामगारांच्या रोजंदारीमध्ये अनियमितता येऊ लागली आहे. मालक लोक काही दिवसांसाठी कामावर बोलावतात, परत सुटी देतात. अनेकांना रोजगारापासून दुरावा सोसावा लागला आहे. शहरासह ग्रामीण भागात हा आकडा मोठा असल्याने याचे परिणाम कामगारांना सोसावे लागत आहेत. काम थांबले; पण जगण्याच्या आधारासाठी रोजगार महत्त्वाचा असणाऱ्या कामगारांना सध्या दोन वेळच्या अन्नाची चणचण भासू लागली आहे. अशा परिस्थितीत कामगारांचे जगणे असह्य झाले आहे. 

रोजगारावर परिणाम... 
व्यवसाय, कारखाने असणाऱ्या मालक लोकांना कोरोनाचा फटका बसला. तयार होणारे उत्पादन, लागणारा कच्चा माल, उत्पादित मालाची विक्री, मागणी व पुरवठा हे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. साऱ्या जगात कोरोनाने थैमान घातल्याने त्याचे परिणाम या घटकांवर झाले आहेत. त्यामुळेच कामगारांच्या रोजगारावर याचे परिणाम होत आहेत. 

शासनाने संघटित व असंघटित कामगारांना कोविड अनुदान दिले पाहिजे. कामगारांचा रोजगार टिकून राहण्यासाठी मालक व कामगार यांच्यामध्ये तडजोड हवी. 
- भरमा कांबळे, कामगार नेते 

दृष्टिक्षेप 
- कोरोनामुळे रोजगाराचे भविष्यच अडचणीत 
- औद्योगिक वसाहतीत मागणीनुसार कारखाने सुरू 
- इचलकरंजीत पाच महिन्यांपासून स्थिती 
- अनेकांचे कुटुंब चालते रोजंदारीवरच 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com