वॉकर्सवर चार पथकांचा वॉच 

वॉकर्सवर चार पथकांचा वॉच 

कोल्हापूर : सकाळी, सायंकाळी अगर शतपावली करायला बाहेर पडताय...तर सावधान. शहरापासून खूप दूर आहोत अशा भ्रमात राहू नका. तुमच्यावर आता करवीर उपविभागीय पोलिसांच्या चार पथकांचा वॉच आहे हे लक्षात ठेवा. 
कोरोनाचा संसर्ग रोखायचा आहे, घराबाहेर पडू नका...अशा पोलिसांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम अनेक नागरिक करीत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस घरात बसून असलेल्यांना आता आपल्या तब्येतीची काळजी वाटू लागली आहे.

त्यासाठी फिरायला जाण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. शहरासह अनेक ग्रामीण भागात मॉर्निंग, इव्हिनिंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याच पटीत रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणाऱ्या हौशागौशांची मोठी वाढ झाली आहे. शहर पोलिसांनी अशा वॉकर्सवर चांगलाच चाप बसवला आहे. करवीर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली वॉकर्सवर कारवाई केली जात आहे. ही कारवाई अधिक कडक करण्यासाठी आता चार स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. 

आर. के. नगर, पाचगाव, कळंबा, नवीन वाशीनाका, रिंगरोड, पुईखडी, कागल आदी परिसरातील वॉकर्सवर या पथकाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. सकाळ, संध्याकाळ व रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर गस्त घालणार आहे. संबंधितांना पकडून त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. 

मॉर्निंग, इव्हिनिंग वॉकसह शतपावलीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. संबंधितांवर विभागातील सर्व पोलिस ठाण्यांचा वॉच आहे. तसेच यासाठी चार पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. 
डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस उपअधीक्षक, करवीर. 

 

25 जणांवर कारवाई... 
शिवाजी पार्क, जिल्हाधिकारी कार्यालय चौक, मोहिते कॉलनी, सायबर चौक याठिकाणी 25 मॉर्निंग वॉकर्सना पोलिसांनी पकडले. त्यांच्यावर आज शाहूपुरी व राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक स्मिता पाटील, प्रथमेश पाटील, जगदीश बामणीकर, सहायक फौजदार डंबाळे आणि राजारामपुरी पोलिसांनी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com