esakal | रामफळाला बाजारपेठ आहे, परंतु लागवडीकडे मात्र दुर्लक्ष

बोलून बातमी शोधा

the fruit sale price market good but cultivation ignores in kolhapur

शेतकऱ्यांनी रामफळाचे उत्पादन घ्यायचे ठरवले तर या मालाला बाजारपेठ आहे.

रामफळाला बाजारपेठ आहे, परंतु लागवडीकडे मात्र दुर्लक्ष
sakal_logo
By
अमोल सावंत

कोल्हापूर : रामफळ (कस्टर्ड ॲपल) सर्वांना माहिती असते. रामफळ हे सीताफळाच्या जातीचे असते. वर्षभर बाजारपेठेत ही फळे मिळत नाहीत. पूजाअर्चा विधीत जशी अन्य फळे असतात, तसे रामफळ नसते. चवदार असूनही क्वचित लोक ते घेतात. कपिलतीर्थ, लक्ष्मीपुरी किंवा महापालिकेच्या बाजूला बसलेल्या विक्रेत्यांकडून दिवसभर एखादे फळ विकले जाते. फळ विक्रेते रामफळ १६० रुपयाला एक किलो असा दर सांगतात. उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, बीड जिल्ह्यातून ही फळे इथे विक्रीसाठी येतात. शेतकऱ्यांनी रामफळाचे उत्पादन घ्यायचे ठरवले तर या मालाला बाजारपेठ आहे.

बिब्बा, कवठ, सीताफळ, जांभूळ, रामफळांच्या लागवडीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रयत्न करत आहे; मात्र, शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने कोरडवाहू फळ पिकांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रामफळसुद्धा असेच एक दिवस नामशेष होऊन जाईल, अशी भीती कृिषतज्ज्ञ  व्यक्त करतात. अपवाद म्हणजे, भूम तालुक्‍यातील बार्शीपासून १० किलोमीटरवरील मानकेश्वरमधील रामचंद्र जोशी यांनी रामफळाची ५० एकरांवर बाग केली आहे. राज्यात रामफळांच्या मोठ्या प्रमाणात बागा नाहीत.

हेही वाचा - राजकीय पार्श्‍वभूमी नसताना स्वयंपाक घरातून थेट महापौर पदाच्या  थेट खुर्चीत

ग्रामीण भागात परसदारी किंवा शेतावर एखादे झाड असते. राहुरी, परभणी, आंध्र प्रदेशातील संगारेड्डी येथील सीताफळ संशोधन केंद्रातही रामफळावर संशोधन सुरू नाही. कृषी विद्यापीठात नवीन प्रजातीचे वाण विकसित केलेले नाही. अन्य फळांच्या बागांबरोबर काही शेतकरी रामफळ लावतात; पण शेळी, म्हैस, गायी, गवा आदी प्राण्यांपासून बागेचे संरक्षण करण्यासाठी; कारण रामफळाची पाने विषारी असल्यामुळे ते कोणताही प्राणी खात नाही. उन्हाळयात या झाडाला पाणी लागत नाही. फेब्रुवारीपासून झाडांची पानगळ सुरू होते. मार्च ते जूनमध्ये पाणी दिले नाही तरी झाड तगते.

अर्थकारण असे

रामफळाच्या एका झाडापासून वर्षभरात सुमारे २५ किलो फळे मिळतात. जानेवारी ते मार्चच्या कालावधीत झाडाला फळे येतात. एका झाडापासून एक हजार रुपये उत्पन्न मिळते. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये सीताफळ येते. एप्रिलनंतर आंबा येतो. जानेवारी ते मार्चमध्ये रामफळ येते. परिणामी, बाजारपेठेत कोणत्याही फळाशी रामफळाला स्पर्धा करावी लागत नाही. चांगला भाव मिळतो. पुणे, वाशी, सूरत, कोल्हापूर बाजारपेठेत काही शेतकरी रामफळाचा माल पाठवतात. सरासरी सात वर्षाच्या एका झाडापासून वर्षाला १००-१५० फळे उत्पादन मिळते.


संपादन - स्नेहल कदम