Gadhinglaj Eye Donation Movement Anniversary On Sunday Kolhapur Marathi News
Gadhinglaj Eye Donation Movement Anniversary On Sunday Kolhapur Marathi News

गडहिंग्लजच्या नेत्रदान चळवळीचा रविवारी वर्धापनदिन

गडहिंग्लज : गडहिंग्लज व आजरा तालुक्‍यात सुरू असलेल्या मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा सातवा वर्धापनदिन रविवारी (ता.15) होणार आहे. करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेच्या मैदानावर सायंकाळी सातला हा कार्यक्रम होईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती आहे. वर्षभरात मरणोत्तर नेत्रदान झालेल्या 11 नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा गौरवपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. 

अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे सात वर्षांपूर्वी नेत्रदान चळवळीची सुरवात झाली. सध्या अत्याळ, करंबळी, बेळगुंदी, कौलगे, ऐनापूर, भडगाव, सरोळी (ता. आजरा) या गावात चळवळीचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. या गावासह गडहिंग्लज शहर, लिंगनूर कसबा नूल, शिप्पूर तर्फ आजरा, उत्तूर (ता. आजरा), बामणे (ता. भुदरगड) या गावातून एकूण 60 जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. चळवळीचे यापूर्वीचे वर्धापनदिन आदर्श गाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे, तीन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले अंध उद्योजक भावेश भाटीया (महाबळेश्‍वर), अंधांच्या उच्च शिक्षणासाठी काम करणाऱ्या मीरा बडवे (पुणे), "अंनिस'चे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या उपस्थितीत झाले आहेत. 

यंदा करंबळी येथे होणाऱ्या सातव्या वर्धापनदिनाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सदानंद पाटणे यांची प्रमुख उपस्थिती आहे. या कार्यक्रमात कै. कुणाल जाधव, कै. बंडू कुराडे (ऐनापूर), कै. संभाजी पाटील, कै. लक्ष्मीबाई गाडीवड्ड, कै. नारायण पाटील (अत्याळ), कै. कृष्णाबाई देसाई, कै. नानासाहेब पाटील (सरोळी), कै. नानासाहेब जाधव, कै. शैला हत्तरकी (गडहिंग्लज), मधुकर पोकळे (उत्तूर), कै. आणाप्पा मोरे (लिंगनूर कसबा नूल) या नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरवपत्राचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

ओळख चेतना सिन्हांच्या कार्याची... 
म्हसवड (जि. सातारा) येथील चेतना सिन्हा महिला व शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर गेल्या 25 वर्षांपासून काम करतात. त्यांनी देशातील पहिली महिला ग्रामीण बॅंक स्थापन केली. या बॅंकेचे सध्या सुमारे दीड लाख सभासद आहेत. माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण महिला उद्योजकांसाठी बिझनेस स्कूल, कम्युनिटी रेडीओ, चेंबर ऑफ कॉमर्ससह दुष्काळी भागात बंधारे उभारले आहेत. अर्जेंटिना येथे झालेल्या W20 समिट 2018 आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 48 व्या वार्षिक सभेचे त्यांनी सहअध्यक्षपद भूषविले आहे. देशातील 50 सर्वोच्च महिला उद्योजकांत चेतना सिन्हा यांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणासाठी मिळालेला देशातील सर्वोच्च "नारी शक्ती' हा पुरस्कारच त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यास पुरेसा ठरणारा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com