
तीन दिवस होणाऱ्या या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्हातील 16 संघ सहभागी आहेत. स्पर्धेसाठी एकूण पन्नास हजार रुपयांची बक्षिसे आहेत.
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे आमंत्रितांच्या नाईन साईड आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेला उद्यापासून (ता. 19) प्रारंभ होत आहे. तीन दिवस होणाऱ्या या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्हातील 16 संघ सहभागी आहेत. स्पर्धेसाठी एकूण पन्नास हजार रुपयांची बक्षिसे आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा बाद पद्धतीने होईल. रविवारी सायंकाळी या स्पर्धेचा अंतिम सामना आहे.
गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे गेली सतरा वर्षे दिवाळी सुटीत लोकवर्गणीतून अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा घेतल्या जातात. पंरतु, यंदा कोरोनामुळे प्रथमच या स्पर्धेत खंड पडला. त्यामुळे स्पर्धाची ही पंरपंरा कायम रहावी, या उदेशाने या वर्षी अखिल भारतीय स्पर्धेऐवजी आंतरराज्य स्पर्धा होत आहे. कोल्हापूर, मिरज, सांगली, बेळगाव, निपाणीसह स्थानिक संघाना स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गारगोटी, मुरगूड, उत्तूर येथील संघानाही प्रोत्साहन मिळावे यासाठी खास बाब म्हणून प्रवेश दिला आहे. पहिले दोन दिवस पहिल्या आणि दुसऱ्या फेरीचे सामने होतील. रविवारी उपात्यंपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामना होईल.
सायंकाळी चार वाजता ज्येष्ठ खेळाडू भैरू चौगुले, रामभाऊ पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. युनायटेडचे अध्यक्ष अरविंद बार्देस्कर, उपाध्यक्ष मलिकार्जून बेल्लद, संचालक सुरेश कोळकी, सुनील चौगुले, जगदीश पट्टणशेट्टी, संभाजी शिवारे उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला सामनावीर तर पराभुत संघातील चांगल्या खेळाडूला लढवय्या खेळाडू म्हणून गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा सहसमन्वयक प्रसन्न प्रसादी, सौरभ जाधव यांच्यासह खेळाडू स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
संपादन - सचिन चराटी
kolhapur