जागृती करूनही गडहिंग्लजला दर हजार मुलांमागे 928 मुली

अजित माद्याळे
Friday, 25 December 2020

अलीकडील काही वर्षांपासून सर्वत्र बेटी बचाओ, बेटी पढाओ...कन्या वाचवा...लेक वाचवा आदी जनजागृती मोहिमा घेत असूनही गडहिंग्लज तालुक्‍यात सावित्रीच्या लेकी का कमी होत आहेत.

गडहिंग्लज : अलीकडील काही वर्षांपासून सर्वत्र बेटी बचाओ, बेटी पढाओ...कन्या वाचवा...लेक वाचवा आदी जनजागृती मोहिमा घेत असूनही गडहिंग्लज तालुक्‍यात सावित्रीच्या लेकी का कमी होत आहेत, याची कारणे शोधण्याची वेळ आली आहे. सध्या दर हजार पुरुषांमागे 928 मुलींची नोंद असून या संख्येवरून चिंता व्यक्त केली जात आहे. 

तालुका आरोग्याधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी यांनी तालुक्‍यातील मुलींच्या प्रमाणाचा आढावा घेतल्यानंतर सदस्या श्रीया कोणकेरी यांनी या प्रश्‍नाकडे पंचायत समिती सभागृहाचे लक्ष वेधले. तालुक्‍यात मुलींचे प्रमाण सरासरी 930 ते 940 दरम्यान असते. हा आकडा दरमहा कमी-जास्त होतो. मुलींच्या प्रमाणात जिल्ह्यात तालुका तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर असल्याचेही डॉक्‍टरांनी सांगितले. परंतु, मुलांमागे मुलींचे प्रमाण सरासरी 950 च्या पुढे असणे चांगले समजले जाते.

ही संख्या ओलांडून यादीमधील स्थान सुधारण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली. डॉ. अथणी व उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे यांनी सांगितलेल्या कारणांवर सभागृहात गांभीर्याने चर्चा होवून गरोदर मातांमध्ये सामाजिक भान आणण्यासाठी जनजागृतीची गरज ठळक झाली. 

वास्तविक गरोदर मातांची नोंदणी व तपासणी शासनाच्या आरोग्य यंत्रणेतून होत असते. मात्र एक अथवा दोन मुलीनंतर गरोदर असलेल्या काही माता व कुटूंबातील सदस्यांकडून त्याची माहिती लपविली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. गरोदरनंतर पाच किंवा सहा महिन्यानी याची माहिती आरोग्य यंत्रणेकडे दिली जाते. म्हणजेच पोटात मुलगी की मुलगा आहे, याची कुठे तरी तपासणी होत असावी, अशी शंका सभागृहात डॉक्‍टरांनी व्यक्त केली. 

मुलगा असेल तर, आरोग्य यंत्रणेला माहिती द्यायची अन्यथा जन्माला येणारे बाळ व्यंग असल्याचे किंवा इतर कारण सांगून गर्भपात करून घ्यायचे, असे प्रकार होत असल्यावरही चर्चा झाली. यासाठीच गावपातळीवर गरोदर मातांची पाहणी प्रभावीपणे होणे आवश्‍यक असल्याचे मत सदस्या जयश्री तेली, बनश्री चौगुले यांनी मांडले. यावर सोनोग्राफी मशिन असलेल्या दवाखान्यांची तपासणी होते की नाही, कुठे गर्भलिंग तपासणी होते का, याचीही खात्री करण्याची गरज व्यक्त झाली. मशिन असलेल्या प्रत्येक ठिकाणी जावून तपासणी होत असून पाहणीत आजअखेर संशय येईल, असे कोणतेही प्रकार आढळले नसल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्टीकरण दिले. 

कर्नाटकात तपासणी? 
महाराष्ट्रात सोनोग्राफी असलेल्या बहुतांश ठिकाणी गर्भलिंग तपासणी होत नाही. परंतु, कर्नाटकात याबाबत काहीशी ढिलाई असल्याची चर्चा आहे. गडहिंग्लज तालुका कर्नाटकशी जवळ असल्याने गर्भलिंगसाठी कर्नाटकचा पर्याय निवडला जातो, अशी माहितीही समोर आल्याचे सांगण्यात येते. हा प्रकार रोखून मुलींची संख्या वाढवण्यासाठी ग्राम पातळीवरच महिलांचे प्रभावी प्रबोधन होणे आवश्‍यक असून त्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ कार्यशाळा घेण्याचा पर्यायही गटविकास अधिकारी शरद मगर यांनी सभागृहात चर्चेत आणला. 

एक नजर मुलींच्या प्रमाणावर (तालुका) 
- 2019-20 : 942 
- 2020-21 (नोव्हेंबर अखेर) : 928 

शून्य ते सहा वयोगटाचा सर्वे 
- एप्रिल ते नोव्हेंबर जन्मलेले अपत्य : 15 हजार 90 
- मुली : 7 हजार 242 
- मुले : 7 हजार 848 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglaj Has 928 Girls Per Thousand Boys Kolhapur Marathi News