काळभैरी डोंगरावर युगूलांचे चाळे

Gadhinglaj Kalbhirav Trmpel Area Is Now New Couples Meet Point Kolhapur Marathi News
Gadhinglaj Kalbhirav Trmpel Area Is Now New Couples Meet Point Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : देवाच्या दारी प्रेमाचे रंग उधळण्याचे वाढते प्रमाण दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. या परिसराचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरव मंदिराच्या आवारात रोज प्रेमी युगूलांचा वावर वाढला आहे. या युगूलांकडून चाळे सुरू असल्याने भाविकांत नाराजी आहे. पोलिस व वनविभागाने तत्काळ गस्त वाढवून अशा युगूलांवर कारवाई करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे. 

गडहिंग्लज शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरच्या डोंगर-झाडीत श्री काळभैरवाचे मंदिर आहे. प्रत्येक आमावस्या, पौर्णिमा आणि इतर कार्यक्रमाव्यतिरिक्त डोंगरावर भाविकांची संख्या कमी असते. इतर दिवशी येणारे भाविक विशेष करून डोंगरावरून असलेल्या डांबरी रस्त्यावरून थेट मंदिरापर्यत जातात. यामुळे पायऱ्यांचा वापर सहसा कोणी करत नाहीत.

डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पायऱ्या आहेत. त्याच्या दुतर्फा झाडे आहेत. दुपारच्या सुमारास हा परिसर निर्जन असतो. याचीच संधी साधून प्रेमी युगूलांचा वावर वाढला आहे. शहरातील लॉजमध्ये युगूलांना प्रवेश देण्यावरून संबंधित लॉजमालकांना पोलिसांनी सक्त सूचना दिल्या आहेत. लॉजवरील कारवाईच्या भितीने काही युगूल ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांकडे आपला मोर्चा वळविल्याचे सांगण्यात येते. परिणामी या पवित्र्य ठिकाणांवर वाढणारा हा प्रकार चिंताजनक असून पोलिसांनी यावर कडक उपाययोजना शोधल्या पाहिजेत. 

आजच (ता. 21) दुपारी पावणे एकच्या सुमारास या पायऱ्यांच्या शेजारीच तीन प्रेमी युगूल बसले होते. त्यांच्यात चाळेही सुरू होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना संताप आणणारा हा प्रसंग होता. यामुळे एका भाविकाने हा प्रसंग कॅमेऱ्यात टिपला.

आजूबाजूला काही भाविकांची ये-जा सुरू असूनही या युगूलांना भान नव्हते असे त्याने सांगितले. यावरून युगूलांना कोणाची भितीच राहिली नसल्याचे स्पष्ट होत आहे. मुळात काळभैरी परिसर झाडांनी व्यापला आहे. मंदिराचे ठिकाण आहे म्हणून पोलिसांचे निर्भया पथकही या परिसरात गस्त घालण्याकडे कानाडोळा करत असते. परंतु हेच या युगूलांच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र आहे. केवळ आजच नव्हे तर हे रोजचे चित्र असल्याचे काही भाविकांनी सांगितले. तेथील वातावरण विशेष करून महिला भाविकांना संताप आणणारा ठरत आहे.

मंदिराभोवती वनविभागाचे जंगल आहे. या जंगलातही प्रेमी युगूल असतात. या भागात वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याची नेमणूक होती. परंतु, सध्या कर्मचारी नसतो. भरदिवसा राजरोसपणे चाळे करणाऱ्या अशा युगूलांवर कारवाईची अपेक्षा आहे. पोलिसांनी रोज दुपारच्या सुमारास एखादी गस्त घातल्यास या प्रकारांना आळा बसण्याची शक्‍यता आहे. देवाच्या दारातीलच हे प्रकार पोलिस व वनविभागाचे प्रशासन गांभीर्याने घेणार का? असा प्रश्‍नही भाविक विचारत आहेत. 

सामानगडावरील प्रकारांना आळा 
ऐतिहासिक किल्ले सामानगडावर प्रेमी युगूलांच्या वावरसह ओल्या पार्ट्यांचेही प्रमाण वाढले होते. काही वर्षापासून दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे किल्ला संवर्धनाचा उपक्रम सुरू आहे. त्यातच असे प्रकार होत असल्याने संताप व्यक्त होत होता. यावर पर्याय म्हणून दुर्गवीर प्रतिष्ठानने एका गडपालाची नेमणूक केली आहे. रजिस्टरमध्ये नाव नोंदवूनच पर्यटकांना गडावर सोडले जाते. यामुळे अशा अवैध प्रकारांना आळा बसत आहे. चार दिवसापूर्वी एक युगूल सापडले. यातील मुलगी अल्पवयीन होती. त्यांना समजावून सोडून देण्यात आले. ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवरील या वाढत्या प्रकारांना पोलिसांनीही चाप बसवण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com