गडहिंग्लज पोलिसांनी 29 जणांना दिला दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

बाजारपेठेतील व्यवहार कशा पद्धतीने केले जावेत, याबाबत नियम गठीत करण्याचा प्रयत्न केला; परंतु ते धाब्यावर बसवण्यात आले. यामुळे प्रशासन हतबल झाले. सांगूनही ऐकत नसतील तर होऊ दे काय व्हायचे ते अशाप्रकारची मानसिकता तयार झाल्याने रान मोकळे झाले आहे.

गडहिंग्लज : मास्क न वापरता फिरणाऱ्या 29 नागरिकांवर येथील पोलिसांनी कारवाई करून दणका दिला. गडहिंग्लज, हलकर्णी, इंचनाळ, माद्याळ, बहिरेवाडी, लिंगणूर, कडगाव, हसूरचंपू, महागाव, बुगटे अलूर, तेरणी, मांगणूर आदी गावांतील हे नागरिक आहेत. विना मास्क सार्वजनिक ठिकाणी कोरोना संसर्ग होईल, अशा पद्धतीने फिरल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला आहे. 

बाजारपेठेतील व्यवहार कशा पद्धतीने केले जावेत, याबाबत नियम गठीत करण्याचा प्रयत्न केला; परंतु ते धाब्यावर बसवण्यात आले. यामुळे प्रशासन हतबल झाले. सांगूनही ऐकत नसतील तर होऊ दे काय व्हायचे ते अशाप्रकारची मानसिकता तयार झाल्याने रान मोकळे झाले आहे. नियमांचे उल्लंघन करून बहुतांशी लोक निवांत फिरत आहेत. गडहिंग्लज बाजारात परिसरातील खेड्यांतून नागरिकांची वर्दळ असते. कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असतानाही विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यांच्यावर पोलिसांनी बडगा उगारला. 

दरम्यान, मार्च ते 28 जूनपर्यंत विनाकारण वाहन घेऊन फिरणे, क्वारंटीनचे नियम न पाळणे, मास्क, सॅनिटायझर, हॅंड ग्लोज न वापरता व्यवहार करणे आदी कारणामुळे 152 गुन्हे पोलिसांनी दाखल केले होते. त्यातील 75 गुन्ह्यांतील 132 जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शिक्षा देऊन 2 लाख 11 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापुढेही कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. दुकानदारांनीही सर्व नियम पाळून व्यवहार करावेत. अन्यथा संबधित दुकान सील करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglaj Police Took Action Against 29 People Kolhapur Marathi News