गडहिंग्लज बंदला संमिश्र प्रतिसाद 

Gadhinglaj Responds To Closed Movement Kolhapur Marathi News
Gadhinglaj Responds To Closed Movement Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवृत्त कामगारांची थकीत देणी मिळविण्यासाठी महिनाभरापासून धरणे आंदोलन सुरू आहे. त्यांनी आज गडहिंग्लज बंदची हाक दिली होती. त्याला शहरातील व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. सकाळच्या टप्प्यात तुरळक दुकाने वगळता व्यवहार बंदच होते. सायंकाळी व्यवहार सुरळीत झाले. दरम्यान, निवृत्त कामगारांनी शहरातून फेरी काढली. तसेच कोपरा सभाही घेतली. 

थकीत देणी मिळविण्यासाठी निवृत्त कामगारांचे 14 जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरू आहे. महिना उलटला तरी तोडगा निघालेला नाही. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज निवृत्त कामगारांनी गडहिंग्लज बंदची हाक दिली होती. व्यापारी असोसिएशनला तसे आवाहन केले होते. त्याला व्यावसायिकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. सकाळच्या सत्रात बहुतांश व्यावसायिकांनी दुकाने बंदच ठेवणे पसंद केले. काही जणांनी आपले व्यवसाय सुरू ठेवले होते. बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. दुपारनंतर हळूहळू दुकाने सुरू होऊ लागली. 

तत्पूर्वी, सकाळी साडेअकराच्या सुमारास निवृत्त कामगारांनी शहरातून फेरी काढली. प्रांत कार्यालयापासून फेरीला सुरवात झाली. लक्ष्मी रोड, नेहरू चौक, बाजारपेठ, वीरशैव चौक, संकेश्‍वर मार्ग, मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर कामगार पोहोचले. कामगारांनी व्यावसायिकांना बंदचे आवाहन केले. नेहरू चौकात कोपरा सभा झाली. कामगारांचे नेते शिवाजी खोत यांनी आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली. चंद्रकांत बंदी, सुभाष पाटील, लक्ष्मण देवार्डे, महादेव मांगले, सुरेश पाटील, बबन पाटील, बाळासाहेब मोहिते, श्रीकांत रेंदाळे यांच्यासह निवृत्त कामगार उपस्थित होते. 

उपोषणकर्ते रुग्णालयातच 
"गोडसाखर'चे चार कामगार गुरुवारपासून (ता. 11) आमरण उपोषणाला बसले आहेत. शिवाजी पाटील, आप्पासाहेब कांबळे, विठ्ठल चुडाई, हणमंत चौगुले यांचा समावेश आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी (ता.14) उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या चौघांवर आजही उपचार सुरू होते. 

बार असोसिएशनचा पाठिंबा... 
"गोडसाखर' निवृत्त कामगारांच्या आंदोलनाला आज गडहिंग्लज तालुका ऍडव्होकेट बार असोसिएशनने पाठिंबा दिला. निवृत्त कामगारांना कायदेशीर सल्ल्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

चेंबर ऑफ कॉमर्सकडून 
शिवाजी खोत यांचा निषेध 

गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांनी आज बंद पुकारला होता. यावेळी कामगारांनी काही व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याची सक्ती केली. तसेच चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष राजेश बोरगावे यांच्यावर कामगारांचे नेते शिवाजी खोत यांनी व्यक्तिगत टीका केली. या घटनेचा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे निषेध करण्यात आला. त्याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकात म्हटले आहे, कारखान्याच्या निवृत्त कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्याकडून पूर्वकल्पना न देता बंद जाहीर करण्यात आला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांना बंदची माहिती न पोचल्यामुळे त्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुकाने उघडली. दरम्यान, निवृत्त कामगारांनी शहरातून फेरी काढून काही व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याची सक्ती केली. तसेच बोरगावे यांच्याविषयी खोत यांनी ध्वनीक्षेपकावरून व्यक्तिगत पातळीवर व त्यांच्या व्यापारावर टीका केली. भविष्यात असे प्रकार घडल्यास व्यापाऱ्यांनाही रस्त्यावर उतरावे लागेल. चेंबर ऑफ कॉमर्स, शहर किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, सराफ व सुवर्णकार असोसिएशन, नाभिक संघटनेच्या प्रतिनिधींच्या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com