गडहिंग्लजला कारखाना निवडणुकीचे वेध

अजित माद्याळे
Monday, 11 January 2021

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) विद्यमान सभागृहाची मुदत मार्चमध्ये संपणार आहे.

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) विद्यमान सभागृहाची मुदत मार्चमध्ये संपणार आहे. आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने संबंधित विभागाने मागितलेली प्राथमिक माहिती पंधरवड्यापूर्वी कारखान्याने सादर केल्याची चर्चा आहे. यामुळे या निवडणुकीचे वेध राजकीय वर्तुळाला लागले आहेत. कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलणार की वेळेत होणार, याबाबत अजून तरी संभ्रमावस्था आहे. 

कारखान्याच्या सलग तीन निवडणुकांमध्ये (2001 ते 2016) ऍड. श्रीपतराव शिंदे व प्रकाश चव्हाण यांची युती कायम राहिली. तिसऱ्या टर्ममध्ये (2011 ते 2016) आर्थिक अडचणीत असलेला कारखाना चालविण्यास देण्याचा मुद्दा पुढे आला. याच कारणावरून शिंदे व चव्हाण यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू झाली. अखेर चव्हाणांनी 15 संचालकांसह बंड केले. यातून चव्हाणांकडे सत्ता आल्यानंतर त्यांच्या पुढाकाराने सात वर्षांपूर्वी पुण्याच्या ब्रिस्क कंपनीला कारखाना चालवण्यास दिला. तेव्हापासून शिंदे-चव्हाणांमधील बेदिली कायम आहे. 

या पार्श्‍वभूमीवर गतवेळच्या निवडणुकीत राजकारणाने वेगळे वळण घेतले. राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जनता दलाचे नेते ऍड. श्रीपतराव शिंदे व कॉंग्रेसचे संग्रामसिंह नलवडे यांची; तर त्यांच्या विरोधात माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, कॉंग्रेसचे सदानंद हत्तरकी, शिवसेनेचे संग्राम कुपेकर, अप्पी पाटील यांची आघाडी रिंगणात उतरली. राजेंद्र गड्ड्यान्नावर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचेही तिसरे पॅनेल होते. बहुमत शिंदे-मुश्रीफ-नलवडे आघाडीला मिळाले.

विद्यमान सभागृहात राष्ट्रवादी-कॉंग्रेस-जनता दलाचे 11 तर विरोधी आघाडीचे 8 संचालक असे बलाबल आहे. मार्चमध्ये या सभागृहाची मुदत संपत आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान सभागृहाची मुदत कधी संपते, चेअरमन - व्हा.चेअरमन निवड कधी झाली यासंदर्भातील माहिती कारखान्याने सादर केल्याची चर्चा आहे. यामुळे आता गोडसाखर निवडणुकीची चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे. कारखान्याच्या आगामी निवडणुकीत राजकीय कंगोरे कसे असतील, याविषयीच्या चर्चेला तोंड फुटले आहे. गतवेळेसारखीच युती, आघाडी कायम राहणार की सोयीच्या राजकारणाचा उदय होणार, हे आता निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतरच कळणार आहे. 

कारखाना-पालिकेची सांगड 
कोरोनामुळे कारखाना निवडणूक पुढे ढकलायची वेळ न आल्यास आधी कारखाना आणि नोव्हेंबरमध्ये पालिकेचे रणांगण असेल. यामुळे कारखाना निवडणुकीचे पडसाद पालिकेत उमटण्याची शक्‍यता आहे. पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या दिशेने आतापासूनच वाटचाल सुरू ठेवणारी राष्ट्रवादी त्याआधीच्या कारखाना निवडणुकीत जनता दलाबाबत कोणती भूमिका घेते, हे पाहणेही औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 
 

संपादन - सचिन चराटी

KOLGAPUR


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadhinglajkar Factory Election Soon Kolhapur Marathi News