शिकलेल्यांना देवच त्यांना सुबुद्धी देवो... 

सुनील पाटील
गुरुवार, 9 एप्रिल 2020

"कोरोना'मुळे शासन आपल्या काळजीसाठी ऐकमेकांमध्ये अंतर ठेवायला सांगतयं. आम्ही शेतात राबतो, तरीही तोंडाला मास्क आणि उसाची सरी भांगलताना (खुरपणी) एकमेकींमधलं अंतर तीन ते चार फुट ठेवतोय. पण शिकलेल्यांना हे ज्ञान कोण देणार ? देवच त्यांना सुबुद्धी देवो...असे शेतात काम करणाऱ्या महिला सांगत होत्या. 

कोल्हापूर : "कोरोना'मुळे शासन आपल्या काळजीसाठी ऐकमेकांमध्ये अंतर ठेवायला सांगतयं. आम्ही शेतात राबतो, तरीही तोंडाला मास्क आणि उसाची सरी भांगलताना (खुरपणी) एकमेकींमधलं अंतर तीन ते चार फुट ठेवतोय. पण शिकलेल्यांना हे ज्ञान कोण देणार ? देवच त्यांना सुबुद्धी देवो...असे शेतात काम करणाऱ्या महिला सांगत होत्या. 

पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील शेतात काही महिला उसाच्या शेतामध्ये खुरपणीचे काम करत होत्या. सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत यांच्या कामाची वेळ. सकाळी अकरा वाजता घरातून आणलेले जेवण घेत असतानाही एकमेकींमधील अंतर सोडायला विसरल्या नाहीत. 

उन्हात काम करुन रापलेले चहेरे, शेतात उगवलेले तण काढून काळ्या मातीने मळलेले हात, हाताला उसाचा पाला कापू नये म्हणून घरातील पुरूषांचा फाटलेला शर्ट अंगात घालून या महिला शेतात बसून जगाचे ज्ञान सांगत होत्या. खेड्यातील लोकांना "कोरोना' कशानं बरा होतो हे माहिती नाही. तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा आणि लोकांमधील एकमेकांमध्ये अंतर ठेवावे ऐवढंच समजतं. सुरक्षित अंतर ठेवून आपला दैनंदिन व्यवहार किंवा शेतातले काम केल्यास आम्हाला काहीही होणार नाही.

दक्षता घेणे हेच आपल्या हातात आहे. गाय-म्हशीच्या धारा काढून संस्थेतही पांढऱ्या रंगाच्या चौकोणात उभं राहूनच दुध घालतो. शेतीची कामे थांबवून चालत नाहीत. गेल्यावर्षी पुरामूळे मोठा फटका बसला. आता घरातून बाहेर पडून चालणार नाही. सरकारने शेतकऱ्यांना सवलत दिली आहे. त्याचा गैरफायदा अजिबात घेत नसल्याचेही ही माऊली सांगण्यास विसरल्या नाहीत. आमच्या सारख्या अज्ञानी बायांनी हे सांगणे बरोबर नाही. पण, शिकलेल्यांना समजच नसल्यासारखी वागतात, असे या महिला सांगत होत्या. 

सकाळी सात वाजता घर सोडून शेतात आलो आहे. येताना तोडांला मास्कही लावला आहे. काम करतानाही आमच्या चार-पाच जणीमध्ये तीन-चार फुटांचे अंतर राहिल याची काळजी घेतोय. आता शिकलेल्यांनीही असं करावं म्हणंजे झालं. जेवतानाही आम्ही एकमेकींपासून लांब-लांब बसलो आहे. 
- रुक्‍मिणी पांडुरंग पाटील, पाडळी खुर्द (ता. करवीर) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: God only gives those who are learned ...