कुरुंदवाड पालिकेच्या राजकारणात आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर गटाची दमदार ‘एंट्री’?

gokul election rajendra patil yadravkar entry signal political marathi news
gokul election rajendra patil yadravkar entry signal political marathi news

कुरुंदवाड( कोल्हापूर) : निवडणुकीसाठी आतापासूनच साखरपेरणी सुरू झाली आहे. गत दोन निवडणुका पक्षीय पातळीवर झाल्या. यंदा पक्षीय आघाड्या कशा होणार, याबाबत उत्सुकता आहे. पालिकेच्या राजकारणात यंदा तालुक्‍याचे नेते आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाची ‘एंट्री’ होण्याचे 
संकेत आहेत.

फ्लॅशबॅक
येथील पालिकेचे राजकारण वर्षानुवर्षे जयराम पाटील, रावसाहेब पाटील व रामचंद्र डांगे या तीन नेत्यांभोवती फिरत आले आहे. त्यातही जयराम पाटील हे सर्वांत नशीबवान राहिले. दोन वेळा लोकनियुक्त नगराध्यक्ष, तर दोन वेळा सदस्यांमधून नगराध्यक्ष अशी तब्बल १५ वर्षांहून अधिक काळ शहराची सेवा करण्याची संधी त्यांना शहराने दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांचे निकटचे म्हणून त्यांची ओळख असून, पालकमंत्र्यांचे भक्कम पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील उमेदीच्या काळात नगराध्यक्ष होते. सोबतीला शहराची पाटीलकीही होती. त्यामुळे खूप मोठे वलय त्यांच्याभोवती होते. शिवाय राजकारणात ते लांब पल्ला मारतील असे वाटत असतानाच त्यांच्या राजकारणाला या ना त्या कारणाने खीळ बसली. पुढे दोन वेळा थेट नगराध्यक्ष निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.

संस्थात्मक ताकदही त्यांनी तयार केली. शहरात जयराम पाटील विरुद्ध गट रावसाहेब पाटील असा राजकीय डाव कायम असल्याने त्यांचा गटही कायम प्रबळ राहिला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांचे नेतृत्व ते मानतात. या दोन पाटलांच्या संघर्षपूर्ण राजकारणात सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून पुढे आले ते रामचंद्र डांगे. तेही नशीबवानच. ते स्वत: नगराध्यक्ष असताना त्यांच्या पत्नी हौसाबाई उपनगराध्यक्ष होत्या. पुढे मुलगी कविता व सून मनीषा नगराध्यक्ष बनल्या. मुलगा उदयही नगरसेवक आहे. या तीनही नेत्यांनी ३० वर्षांत कधी एकत्र, तर कधी विरोधात राजकारण केले; मात्र नियतीने गत निवडणुकीत त्यांना एकमेकांसमोर 
उभे केले.

सद्यस्थिती
आता निवडणुकीचे नगारे वाजत आहेत. आतापासूनच वॉर्डावॉर्डातील इच्छुक मंडळी नेते व कारभारी मंडळींपर्यंत समर्थकांकरवी शिफारस व्हावी यासाठी फिल्डींग लावत असल्याचे दिसते. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांत निवडणूक होईल, तर अपक्ष आमदार व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. महाविकास आघाडीचे ते सदस्य आहेत; मात्र पालिका राजकारणात आपल्या शाहू आघाडीचा पॅटर्न ते इथे राबवण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे नेतृत्व युवा नेते विजय पाटील यांच्याकडे राहणार आहे, तर मंत्री यड्रावकरांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानंतर त्यांचे नेतृत्व मानणारे रावसाहेब पाटील व समर्थक राष्ट्रवादी म्हणूनच निवडणूक लढवतात की, यड्रावकरांच्या संभाव्य शाहू आघाडीचा पर्याय वापरतात यावर महाविकास आघाडीचे चित्र अवलंबून आहे.

पुढे काय?
भाजपने गत निवडणुकीत चांगली मोट बांधून यश मिळविले होते. रामचंद्र डांगेंच्या नेतृत्वाखालील भाजप लढला होता. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती. आता महाविकास आघाडीचे सरकार असून, तुलनेने भाजपचे सामर्थ्य कमी झाले आहे. 
त्यामुळे आता डांगे भाजप म्हणून रिंगणात उतरणार की, अन्य पर्यायांचा विचार करतात हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर गटाच्या विस्तारासाठी यंदा येथील निवडणुकीच्या रिंगणात उतरून कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, त्यांची ‘एंट्री’ झाल्यास रंगत वाढणार आहे. शिवसेनेकडूनही निवडणुकीसाठी चाचपणी सुरू असून, महाविकास आघाडी झाल्यास त्यात सहभागी होऊन काही जागा पदरात पाडून घेण्यावर त्यांचा भर असेल.


घडलं-बिघडलं
 पाच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीत कुरबुरी कायम
 १४ कोटींची महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना बासनातच
 ‘राष्ट्रवादी’मधील नाराज व भाजपचा शहर बचाव समितीचा 
    प्रयोग फसला
 शहराच्या विकासाची ब्लू प्रिंट दिसलीच नाही
 भाजपच्या काळात पालिकेला निधीचा दुष्काळ
 महाविकास आघाडीच्या काळात निधीची खैरात
पक्षीय बलाबल...
 एकूण जागा : १७ 
 काँग्रेस : ६
 राष्ट्रवादी : ५
 भाजप : ५
 स्वाभिमानी : १ रिक्त (मृत)
 लोकनियुक्त 
   नगराध्यक्ष : काँग्रेस

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com