आश्‍चर्य....कसबा बीडला भांगलण करताना सापडली सोन्याची मुद्रा 

नामदेव माने
Thursday, 18 June 2020

कसबा बीड येथील लक्ष्मी बाळासाहेब तिवेल या महिलेला भाताच्या शेतात भांगलण करीत असताना ही सोन्याची मुद्रा सापडली. 

कसबा बीड : सुवर्ण राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड गावात दरवर्षी सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे. मृग नक्षत्रात ते गावाच्या सभोवतालच्या शेतात कुठेही सापडते.

अगदी लहान स्वरूपात हरबऱ्याच्या डाळीच्या आकाराची ही सोन्याची मुद्रा (भेडा) असते. येथील लक्ष्मी बाळासाहेब तिवेल या महिलेला भाताच्या शेतात भांगलण करीत असताना ही सोन्याची मुद्रा सापडली. 

बाराव्या शतकातील भोजराजाच्या काळात कसबा बीड हे राजधानीचे शहर होते. गावाला सभोवती तटबंदी होती. त्या काळात लोकांशी देवाणघेवाण करण्यासाठी राजा सोन्याचा भेडा हे साधन म्हणून वापरत असे. कालानुरूप ही राजधानी लोप पावली. राजधानी चे अवशेष गावाच्या आसपास आहेत याच बरोबर या सोन्याच्या मुद्रा सापडतात. 

डाळीच्या आकाराची असल्यामुळे पक्षी या मुद्रा खाद्य म्हणून खातात व त्याच्या विष्ठेद्वारे बर्याच वेळेला या मुद्रा केळीच्या पानावर, घराच्या छतावर, गाईच्या शेणावर अशा ठिकाणी सापडतात. गावात भरपूर लोकांकडे मुद्रा पहावयास मिळतात. कांही नी त्या दागिना करून गळ्यात घातला आहे. मृग नक्षत्रातील पहिला पाऊस पडला की, उन्हाने तापलेली जमीन पावसामुळे भिजताच मातीत असणाऱ्या या मुद्रा उघड्या पडतात वजनाने हलक्‍या असल्याने व पुर्ण सोन्याची असल्यामुळे चकाकदार होते त्यामुळे त्या सापडतात. त्यामुळेच येते मृग नक्षत्रात सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे. 

विधीवत पूजा... 
शेतात चार महिलासह भात भांगलण करत होत्या. त्याच वेळी ही मुद्रा सापडली. या मुद्रेवर त्रिशुळ आहे. बऱ्याच वेळेला या मुद्रेवर पिंड, गणपती, त्रिशुळ असे छाप दिसतात. सापडली सोन्याची मुद्रा घरात आणून त्याची देवघरात विधीवत पुजा केली. 

दृष्टिक्षेप
- भोजराजाच्या काळात कसबा बीड राजधानीचे शहर 
- देवाण-घेवाणीसाठी सोन्याचा भेडा साधन म्हणून वापर 
- गावात भरपूर लोकांकडे मुद्रा 
- कांहीनी दागिना करून गळ्यात घातला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A gold coin was found in Kasba Beed