चौकाचौकांत रंगताहेत सरपंचपदाच्या गप्पा

ऋषीकेश राऊत
Monday, 25 January 2021

ग्रामपंचायत निवडणूक निकालात यंदा युवा व नवख्यांना कौल दिला आहे. अनेक गावांत प्रस्थापितांचा गड ढासळला आहे. आता गुलालाने माखलेले चेहरे मात्र सरपंचपदाच्या आरक्षणाच्या चिंतेत दिसत आहेत.

इचलकरंजी : ग्रामपंचायत निवडणूक निकालात यंदा युवा व नवख्यांना कौल दिला आहे. अनेक गावांत प्रस्थापितांचा गड ढासळला आहे. आता गुलालाने माखलेले चेहरे मात्र सरपंचपदाच्या आरक्षणाच्या चिंतेत दिसत आहेत. निवडून तर आलो खरे, पण सरपंचपदाची खुर्ची कोणाकडे असणार हे स्पष्ट नसल्याने सरपंचपदाच्या गप्पा आता चौकाचौकांत रंगताना दिसत आहे. जोपर्यंत सोडत होत नाही, तोपर्यंत "सरपंच ना आपणच' अशा अविर्भावात अनेकजण दिसत आहेत. 

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच गाजली. गावागावांत पॅनेलचा विजय, तर काही ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली. अनेक गावांत एकतर्फी निकाल लागले. विरोधकांचा सुपडा साफ करण्यात अनेकांना निवडणुकीत यश आले. निकाल लागल्यावर उमेदवार घोषित झाले, परंतु गावचा कारभारी सरपंच कोण, बुधवारी (ता.27) समजणार आहे. आरक्षण सोडत झाल्यानंतरच सरपंचपदाची माळ गळ्यात पडणार आहे.

ही प्रक्रिया अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. त्यामुळे निवडून आलेला प्रत्येक जण आपणच जणू सरपंच होणार, या अविर्भावात वावरत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळेपण पाहायला मिळाले. युवा व नवख्या उमेदवारांनी अनेक गावांत प्रस्थापितांविरुद्ध प्रचार करीत अनेक वर्षांपासूनची सत्ता काबीज केली. आता सरपंचपदाच्या आशेने हे चेहरे शड्डू ठोकून आहेत. 

गुलालाने माखलेल्या चेहऱ्यांवर सरपंचपदाच्या आरक्षणाची चिंता दिसू लागली आहे. निघणारे आरक्षण कोणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ टाकेलं यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. ज्या पद्धतीने विजय आपलाच म्हटले जात होते. त्याच पद्धतीने आता आरक्षणाच्या सोडतीतही विजय आपलाच, असे आत्मविश्‍वासाने दावे केले जात आहेत. मतदारांमधील हातातील लढाई जिंकली, मात्र आरक्षण हातात नसल्याने अनेकांनी आरक्षणासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. 

राजकीय कुरघोड्यांना वेग 
सरपंचपदाचे आरक्षण सोडत तोंडावर आल्याने गावगुंडीचे राजकारण तापले आहे. सत्ता काबीज करून सरपंचपदासाठी अपेक्षित सदस्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. अनेकांचे ठरलेली समीकरणे गुलदस्त्यात आहेत, तर अनेक जण समीकरणे बदलण्यासाठी धडपडत आहेत. यासाठी सर्वांना सरपंचपदाचे आरक्षण सोडतीचा दिवस उजाडण्याची प्रतीक्षा लागली आहे. 

 

संपादन - सचिन चरीटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gossip Of Sarpanch Post in Villages Kolhapur Marathi News