esakal | वट असणाऱ्यांना भाव : गावागावांत एकगठ्ठा मतदारांवर डोळा!
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat election atmosphere in gadhinglaj kolhapur

 

विजयापर्यंत पोचण्याचा राजमार्ग : मोठी कुटुंबं गळाला लावण्याचे प्रयत्न

वट असणाऱ्यांना भाव : गावागावांत एकगठ्ठा मतदारांवर डोळा!

sakal_logo
By
अवधूत पाटील

गडहिंग्लज (कोल्हापूर)  : निवडणुकीतील विजय हा केवळ यश-अपयशापुरता मर्यादित नसतो, तर त्या मागे लपलेली असते प्रतिष्ठा. हीच प्रतिष्ठा जपण्याचा, वाढविण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने त्याची प्रचिती येत आहे. विजयापर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळ्या गणितांची मांडणी केली जात आहे. विजयापर्यंत पोचण्याचा राजमार्ग असणाऱ्या एकगठ्ठा मतदारांवर त्यांचा डोळा आहे. 

निवडणूक म्हटले की एकाचा जय, दुसऱ्याचा पराभव हे ठरलेलेच. पण, पराभव सहसा कोणाला पचनी पडत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत तर त्याची तीव्रता अधिक असते. कारण, प्रतिस्पर्धी जवळचाच असतो. कधी शेजारी, तर कधी भावकीतीलच. त्यामुळे पराभव टाळण्यासाठी प्रत्येकाचा अाटापिटा असतो. त्यासाठी वाटेल त्या जोडण्या लावल्या जातात. विजयासाठी नवनव्या गणितांची मांडणी केली जाते. केवळ मांडणीवर न थांबता ती सोडविण्यासाठी प्रसंगी ‘हातचा’ही घेतला जातो.

हेही वाचा- क्रीडा कार्यालयाने  कसली कंबर-

सध्या एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत चालली असली तरी प्रत्येक प्रभागात किमान दोन-चार तरी अशी कुटुंबं टिकून आहेत. साहजिकच या कुटुंबांत मतदारांची संख्याही अधिक आहे. हीच बाब लक्षात घेऊन उमेदवारांकडून या कुटुंबांवर अधिक लक्ष दिले जात आहे. एकगठ्ठा मते मिळवून लढाई सोपी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्याशी थेट संपर्क ठेवला जात आहेच; पण या कुटुंबाशी जवळचे असणाऱ्या व्यक्तींकडून साकडे घातले जात आहे.

जवळपास प्रत्येक गावात वाड्या-वस्त्या आहेत. काही ठिकाणी पाच-दहा कुटुंबांची वस्ती असणाऱ्या छोट्या वाड्याही आहेत. तेथील मतदारांसाठी वेगळे नियोजन केले जात आहे. त्यांचे अनेक प्रश्‍न आहेत. यात काही मूलभूत प्रश्‍नांचाही समावेश आहे. याच प्रश्‍नांना हात घातला जात आहे. 

वट असणाऱ्यांना भाव...
राजकारणापासून दूर असणाऱ्या; पण समाजात वट असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांना आपलेसे करण्याचा जोरदार प्रयत्न उमेदवारांनी चालविला आहे. अशा व्यक्तींनी आपल्यासाठी शब्द टाकल्यास तो अधिक प्रभावी ठरू शकेल, हे त्यामागील गणित आहे. त्यामुळे अशा व्यक्तींच्या घरी उमेदवारांची ऊठ-बस वाढल्याचे दिसत आहे.

संपादन - अर्चना बनगे


 

go to top