ई - सकाळच्या बातमीची पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली दखल ; कणेगाव नाक्यावर अडकलेल्या त्या नागरिकांची केली जेवणाची सोय...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

तीन दिवसापासून ते अडकून पडले असून प्रशासनाने पाण्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही सोय केलेली नाही. ई - सकाळ वरील वृत्ताची दखल घेऊन पालकमंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांना कणेगाव नाक्यावर पाठवले.

चंदगड - राज्याच्या विविध भागात नोकरी-व्यवसायानिमित्त गेलेले जिल्ह्यातील नागरिक गावाकडे परत येत असताना कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर कणेगाव नाक्यावर अडकले आहेत. वाहतुकीची सोय नसल्याने ते चालत येत होते. परवाना नसल्याने पोलिसांनी त्यांना तिथे रोखून धरले आहे. यासंदर्भात ई - सकाळ वर बातमी प्रसिद्ध झाली तसेच त्यांना ट्विटर वर ट्विट करत ही बातमी कळवली होती. लगेच पालकमंत्री सतेज पाटील यांनी बातमीची दखल घेत कार्यकर्त्यांकरवी त्या नागरिकांना जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय केली.

नाक्यावर अडकलेल्या लोकांमध्ये चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील सुमारे वीस जण तर जिल्ह्याच्या अन्य भागातील आणखीही काही नागरिकांचा समावेश आहे. यात महिला व लहान मुले सुद्धा आहेत. तीन दिवसापासून ते अडकून पडले असून प्रशासनाने पाण्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही सोय केलेली नाही. ई - सकाळ वरील या वृत्ताची दखल घेऊन पालकमंत्री पाटील यांनी जे. के. पाटील, स्वप्नील जितकर, अविनाश कोळी यांना कणेगाव नाक्यावर पाठवले. त्यांच्याकरवी  जेवण व पाण्याची व्यवस्था केली. प्रत्येक नागरिकाला जेवणाची तिन पॅकेट व पाण्याच्या बॉटल्स देण्यात आल्या. त्यांना कशा प्रकारे घराकडे पाठवता येईल याबाबत चर्चा केली. आपुलकीने विचारपूस झाल्यामुळे या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Satej Patil took note of the e sakal news