आजऱ्यात अर्धा किलोमीटर परिसर "हॉट स्पॉट' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

 तो तबलिगीला जाऊन आला आणि आजारी पडला. त्याने उपचार घेतले पण त्रास कमी झाला नाही. अखेर कोरोना संशयावरून त्याला पथकाच्या निरीक्षणाखाली ठेवले

आजरा ः येथील दर्गा गल्लीतील तरुणाला कोरोनाच्या संशयावरून गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने दर्गा गल्ली "ब्लॉक' केली आहे. शहरातून जाणाऱ्या महागाव मार्गावरील अर्धा किलोमीटरचा परिसर सील केला असून, हा परिसरच "हॉट स्पॉट' बनला आहे. संबंधित तरुणाचे स्वॅब मिरज येथील प्रयोगशाळेकडे पाठवले असून, त्याचा अहवाल उद्या (ता. 8) मिळणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दर्गा गल्लीत जाण्यासाठी मज्जाव केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दिल्ली येथील तबलिगीला जाऊन 28 फेब्रुवारीला आजऱ्यात परतला. त्यांने 2 मार्चला गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. काही दिवसांनंतर शहरात खासगी दवाखान्यात उपचार घेतले होते. काल (सोमवार) त्याला पुन्हा अस्वस्थ वाटल्याने तो ग्रामीण रुग्णालयात गेला होता. चौकशीत तो तबलीगला गेल्याचे समजले. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. तातडीने तो राहत असलेला दर्गा गल्लीच सील करून कुटुंबातील सात सदस्यांना विलगीकरण कक्षात हलवले.

दरम्यान, या घटनेमुळे आज आमदार प्रकाश आबिटकर, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी भेट देऊन परिसराची पहाणी करून प्रशासनाला सूचना केल्या. 

ते 11 जण आयसोलेशनमध्ये 
त्याच्यासह चंदगड, नेसरी, हलकर्णी येथील आणखी 11 जण तबलीगला गेल्याची माहिती आहे. त्यांची चौकशी केली आहे. सर्वांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्यांना गडहिंग्लज येथील आयसोलेशन कक्षात ठेवले आहे. त्यांच्या नातेवाइकांना क्वारंटाईन केले आहे. 

बॅक हिस्ट्रीबाबत घोळ 
तो दिल्लीला कधी गेला? तेथे किती दिवस होता? त्याच्या संपर्कात कोण आले? आजारी पडल्यावर त्याने किती दिवस उपचार घेतले, याची वस्तुस्थितीजन्य माहिती प्रशासनाला मिळत नसल्यामुळे संभ्रम आहे. त्याच्या बॅक हिस्ट्रीबाबत घोळ तयार झाल्याचे सांगण्यात येते. 

ते दोन कोण? 
आजऱ्यातून दिल्ली तबलिगीला आणखीन जण गेले होते. त्यापैकी एक जण उत्तर प्रदेशमध्ये राहिला असून, एक जण सांगलीत आहे, असे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half-kilometer campus "hot spot" today kolhapur marathi news