कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, नद्यांना पूर, धरणे भरण्याच्या टप्यात

प्रतिनिधी
Thursday, 6 August 2020

गगनबावडा तालुक्‍यात आज विक्रमी 317 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राधानगरी धरण क्षेत्रावर 281 मिलिमीटर, तर तुळशी धरण क्षेत्रावर 250 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 48 तासांत राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्‍यता आहे. आज सायंकाळी हे धरण 90 टक्के भरले होते. 1400 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. 

कोल्हापूर ः  गेल्या चोवीस तासांत राधानगरी व गगनबावाडा तालुक्‍यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गगनबावडा तालुक्‍यात आज विक्रमी 317 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राधानगरी धरण क्षेत्रावर 281 मिलिमीटर, तर तुळशी धरण क्षेत्रावर 250 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 48 तासांत राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्‍यता आहे. आज सायंकाळी हे धरण 90 टक्के भरले होते. 1400 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. 
36 तासांत अडीच टीएमसी इतकी पाण्याची वाढ झाली आहे. या धरणाची सध्याची पाणी पातळी 342 फूट इतकी असून, हे धरण 347.50 फुटाला भरते. धरण भरण्यासाठी केवळ सव्वाचार फूट पाणी पातळी कमी आहे. सध्या 7.60 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, पूर्ण क्षमतेसाठी केवळ पाऊण टीएमसी पाण्याची गरज आहे. 
पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून 1400 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सध्या भोगावती नदी पात्रात सुरू आहे, तरीही 300 एमसीएफटीपेक्षा अधिक पाण्याची आवक पाणलोट क्षेत्रातून राधानगरी धरणामध्ये येत असल्याने पाणी पातळी वाढतच आहे. परिसरात 2381 मिलिमीटरपेक्षा इतका पाऊस झाला असून, गेल्या दोन दिवसांतच गेल्या वर्षीच्या पर्जन्यमानाची सरासरी गाठली आहे. काळम्मावाडी धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांत 227 मिलिमीटर इतका पाऊस झाला हे धरण 18 टीएमसी इतके भरले असून, 72 टक्के झाले आहे. 24 तासांत अर्धा टीएमसी पाणी वाढले आहे. शिरगाव आमजाई व्हरवडे दरम्यानचा बंधारा आज सकाळपासून पाण्याखाली गेल्याने सर्व वाहतूक राशिवडेमार्गे सुरू आहे. 

तुळशी धरण 66 टक्के भरले 
धामोड : येथील तुळशी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासांत अतिवृष्टी झाली. 
येथे धरण क्षेत्रात 249 मी.मी पावसाची नोंद झाली. धरणाची पाणी पातळी 1.13 मी.ने वाढली आहे. तसेच धरणातील पाणीसाठ्यात 168 फुटांनी वाढ झाली आहे. तुळशी जलाशय 66 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केळोशी बुद्रुक येथील लोंढा नालाच्या उजव्या सांडव्यातून व इतरत्र 4000 क्‍युसेकचा विसर्ग सुरू आहे. 

गगनबावडा तालुक्‍यात 317 मिलिमीटर पाऊस 
साळवण ः गगनबावडा तालुक्‍यात आज विक्रमी 317 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कुंभी, सरस्वती, धामणी व रुपणी नद्यांना पूर आला आहे. कुंभी नदीच्या पुराचे पाणी कोल्हापूर गगनबावडा मार्गावर असळज, खोकुर्ले, मांडुकली, मार्गेवाडी, साळवण, किरवे याठिकाणी आल्यामुळे मंगळवार रात्रीपासून या मार्गावरील वाहतूक बंद आहे. कुंभी मध्यम प्रकल्प81 टक्के भरला असून, धरणातून 1100 क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. 

आजऱ्यातील व्हिक्‍टोरिया पूल वाहतुकीस बंद 
आजरा ः आजऱ्याजवळील हिरण्यकेशी नदीवरील "व्हिक्‍टोरिया पूल' प्रशासनाने वहातुकीसाठी बंद केला आहे. आज सायंकाळच्या दरम्यान या पुलाच्या मच्छिंद्रीजवळ महापुराचे पाणी येऊन थडकत होते. त्यामुळे हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हिरण्यकेशी नदीला महापूर आला आहे. नदी धोक्‍याची पातळी ओलांडून वाहात आहे. गजरगाव येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. 
 

नृसिंहवाडी मंदिरात पहिला दक्षिणद्वार सोहळा 

नृसिंहवाडी ः कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 24 तासांत दहा फुटांनी वाढ झाली आहे. नृसिंहवाडीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मंदिराजवळ पाणी आले आहे. दत्त देवस्थानच्या वतीने मंदिरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे. मध्यरात्री पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला. शिरोळ, तेरवाड, राजापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कुरुंदवाडजवळील अनवडी पूल ही पाण्याखाली गेला आहे. 

हुपरी कोल्हापूर मार्गावर वाहतूक तीन तास ठप्प 
हुपरी: हुपरी परिसरात गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. येथील सिद्धार्थनगरलगतच्या ओढ्याचे पुराचे पाणी दुपारी रस्त्यावर आल्याने हुपरी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सुमारे तीन तासांहून अधिक काळ बंद पडली होती. 

केकतवाडीत आंबा बाग खचली 
कसबा बीड ः केकतवाडी (ता. करवीर) येथील सदाशिव गोपाळा ढोक व सर्जेराव शामराव ढोक यांच्या शेतातील आंब्याची बाग अतिवृष्टीमुळे सुमारे तीस ते चाळीस फूट खचली आहे. खचलेला जमिनीचा भाग त्यांच्या मालकीच्या विहिरीत जाऊन संपूर्ण विहीर बुजली. यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी घडली. 
शिरोली दुमाला : शिरोली दुमाला, गर्जन, मांडरे येथे ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली. चाफोडी-कांचनवाडी व शिरोली-बाचणी बंधारे पाण्याखाली गेल्याने कोल्हापूरला जाण्यासाठी पर्यायी मार्ग बंद झाले आहेत. 

कोडोलीत घराची भिंत कोसळली 
कोडोली : कोडोली येथील वैभवनगर आश्रमशाळेजवळील काळकाबाईचा माळ येथील कुंडलिक दराप्पा भाते यांच्या घराचे भिंत संततधार पावसाने पडल्याने अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले, तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. 

बाजारभोगाव बाजारपेठेत पूर 
बाजारभोगाव ः कासारी जांभळी नदीच्या खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे पोंबरे, पडसाळी, कुंभवडे हे लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत, तर कासारी (गेळवडे) मध्यम प्रकल्प 80 टक्के भरला आहे. सांडव्यातून 1300 क्‍युसेक विसर्ग सुरु आहे. बाजारभोगावच्या बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. पोहाळे तर्फ बोरगावजवळ मोरीवर पुराचे पाणी आल्याने कोल्हापूर राजापूर राज्यमार्ग बंद झाला. बाजारभोगाव, वाळोली, पेंडाखळे, पिसात्री पूल व मुगडेवाडी बंधारा पाण्याखाली गेले आहेत. प्रसव वेदना सुरू झाल्याने किसरूळ (ता. पन्हाळा) येथील गरोदर महिलेस यांत्रिक बोटीतून बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. 

भुदरगडमधील सहा बंधारे पाण्याखाली 
गारगोटी : भुदरगड तालुक्‍यात सरासरी 72 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली, तर पाटगाव परिसरात 105 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली. पाटगाव प्रकल्पात 78 टक्के पाणीसाठा झाला आहे, तर वेदगंगा नदीवरील शेळोली, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 

तुरंबे, सुळंबी, पंडेवाडी बंधाऱ्यावर पाणी 
सरवडे : सरवडे, सोळांकूर परिसरात दूधगंगा नदीवरील तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तुरंबे, सुळंबी, पंडेवाडी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठावरील पिके पाण्याखाली बुडाली आहेत. कसबा तारळे : भोगावती नदीचे पाणी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पात्राबाहेर पडले असून, कसबा तारळे येथील जुना बंधारा पाण्याखाली गेला आहे. नवीन पुलामुळे वाहतूक मात्र सुरळीतपणे सुरू आहे. 

गगनबावडा मार्गावर कळेजवळ पाणी 
पुनाळ ः कळेजवळ कुंभी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने गगनबावडा कोल्हापूर वाहतूक मरळीजवळ बंद झाली आहे, तरीही गावाकडे जाणारे पाण्यातून धोकादायकरीत्या प्रवास करताना दिसत होते. तिरपण येथे मोटारसायकलवर झाड पडल्याने गाडीचे नुकसान झाले. माजगाव पुलावर पाणी आल्याने माजगाव-पोर्ले रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. 
पन्हाळा ः पन्हाळा तालुक्‍यात सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 88.29 तर पन्हाळयात 98 मि. मि. पावसाची नोंद झाली. आजअखेर पन्हाळ्यात 1223 तर तालुक्‍यात सरासरी 752 मि. मि. पावसाची नोंद झाली आहे. 
सातवे : काखे-मांगले पूल, सावर्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे. सातवे बोरपाडळे या रस्त्यावर आरळेच्या ओढ्याचे पाणी मुख्य रोडवरून वाहू लागल्याने तीन ते चार तास वाहतूक बंद झाली होती. 
कडवी धरण 71 टक्के भरले 
आंबा ः कडवी धरण 71 टक्के भरले. सायंकाळी चार वाजेपर्यंत 85 मिमि पाऊस पडला. कोपार्डे, येलूर, भोसलेवाडी, वालूर, पाटणे, शिरगाव, सवते सावर्डे, कासार्डे, सुतारवाडी, घोळसवडे, जावली, हुंबवली, कोळगाव, टेकोली, येळाणे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 
मानोली व कासार्डे लघुपाटबंधारे तलाव शंभर टक्के भरले आहेत. आंबा, विशाळगड, परळे निनाई, उदगिरी, येळवण जुगाई या भागात पावसाची संततधार सुरू आहे. 

कानसा, वारणानदीला पूर 
तुरुकवाडी : वारणा धरण पाणलोट क्षेत्रात आज 140 मिमी पाऊस झाला. कानसा, कडवी, वारणानदींना पूर आला आहे. कोकरुड- रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. 24 तासांत धरणात वाढ झाली. 34. 40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे धरण 76.52 टक्के भरले आहे. 

कागलमधील पाच बंधारे पाण्याखाली 
कागल : कागल तालुक्‍यातील वेदगंगा नदीवरील कुरणी, सुरुपली, बस्तवडे, नानीबाई चिखली व दूधगंगा नदीवरील सिध्दनेर्ली, सुळकूड हे पाचही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बाचणी पुलावर पाणी आले आहे. दूधगंगा व वेदगंगा या दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. चोवीस तासांत सरासरी 90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
शहरातील जयसिंगराव तलावाच्या पाण्याची पातळी एक फुटाने वाढली आहे. ही पातळी 13.7 फूट झाली आहे. शहरातील मिसाळ खण परिसरातील घरात पाणी शिरले. 

गडहिंग्लज-चंदगड मार्ग बंद 
गडहिंग्लज : मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशी नदी पात्राबाहेर आली आहे. भडगाव पूल पाण्याखाली गेल्यामुळे गडहिंग्लज-चंदगड मार्ग आज दुपारी बारापासून वाहतुकीस बंद झाला आहे. याशिवाय तालुक्‍यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आज सरासरी 55 मिमी पावसाची नोंद झाली. हिरण्यकेशीवरील ऐनापूर, हरळी, गिजवणे, जरळी, निलजी, नांगनूर तर घटप्रभा नदीवरील कानडेवाडी बंधारा पाण्याखाली गेला आहे. यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

- संपादन ः यशवंत केसरकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Kolhapur district